‘शिवाजी’त निवडणुकीचा बिगुल वाजला, ११ सप्टेंबर रोजी मतदान, प्रचाराला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 03:28 PM2022-08-31T15:28:27+5:302022-08-31T15:28:57+5:30
विकास विरुद्ध प्रगती पॅनेलमध्ये रंगणार सामना, ७७४ मतदारांची यादी निश्चित
अमरावती : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याद्वारा स्थापित श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी मंडळातील नऊ पदांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या ११ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, ७७४ मतदारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यंदा निवडणुकीत विकास विरुद्ध प्रगती पॅनेलमध्ये थेट लढत होईल, असे चित्र आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेची ८ सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात १० सप्टेंबर रोजी निवडणुकीची विशेष आमसभा आणि ११ सप्टेंबरला याच महाविद्यालयात पाच केंद्रांवर मतदान होईल. त्यानंतर सायंकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. याकरिता संस्थेचे सुमारे शंभर अधिकारी, कर्मचारी दिमतीला राहणार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील कार्यकारिणीला मंडळाचा कार्यकाळ १४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरला संस्थेची निवडणूक होत आहे. याकरिता ८ व ९ सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेत संस्था कार्यालयात निवडणुकीकरिता नामांकन अर्ज विक्रीकरिता उपलब्ध राहणार आहेत.
१० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आमसभेला सुरुवात होईल. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करणे, दुपारी ३.३० वाजता प्राप्त नामांकन अर्जांची यादी बोर्डावर प्रसिद्ध करणे, दुपारी ३.३१ ते ४.३० दरम्यान प्राप्त नामांकन अर्जांची छाननी, सायंकाळी ५ वाजता वैध नामांकन अर्जांची यादी प्रसिद्ध करणे, ५ ते ६ वाजेपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. तर सायंकाळी ६.३० वाजता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
पाच केंद्रावर सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत मतदान
११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पाच केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. सायंकाळी ७.३० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेकरिता संस्थेचे सुमारे शंभर अधिकारी, कर्मचारी सज्ज असल्याची माहिती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांनी दिली.
अंध, अपंग व आजारी मतदारांकरिता स्वतंत्र केंद्र
मतदान प्रक्रिया पाच मतदान केंद्रांवर होणार असून, पाचव्या क्रमांकाचे मतदान केंद्र हे अंध, अपंग व दीर्घ आजार मतदारांकरिता असणार आहे. त्यांच्या मदतीकरिता घोषणापत्र भरून व निर्वाचन अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्यांचा जवळचा नातेवाईक, यात पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात, भाचा, भाची, पुतण्या, पुतणी, भाऊ, बहीण यापैकी एकाला मदतनीस म्हणून सोबत आणता येणार आहे. त्यांच्याकडे त्यांचा फाेटोसह ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
७७४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डिसेंबर २०२१ मध्ये ८१४ मतदारांची यादी प्रसिद्ध केली होती. या आठ महिन्यांत यातील ४० मतदारांचे निधन झाल्याने मतदार यादीत आता ७७४ मतदार आहेत. त्यामुळे यादीनुसार ७७४ मतदारांना मतदानाचा अधिकार राहणार आहे.
...असे राहील मतदान केेंद्र मतदार
१) - १ ते २५०
२) - २५१ ते ५००
३) - ५०१ ते ७५०
४) - ७५१ ते ८१४
५) - अंघ, अपंग, दीर्घ आजारी, मतदारांकरिता