७ ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक 21 जून रोजी
By जितेंद्र दखने | Published: June 20, 2024 09:44 PM2024-06-20T21:44:57+5:302024-06-20T21:45:06+5:30
पाच तालुक्यांचा समावेश : राजीनामा, अपात्रतेमुळे पदे होती रिक्त
अमरावती: जिल्ह्यात राजीनाम्यामुळे व अन्य कारणाने रिक्त असलेल्या ७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंचपदासाठी शुक्रवार, २१ जून रोजी निवडणूक होत आहे. यातील ३ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी, तर ४ ठिकणी उपसरपंचपदासाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे.
यामध्ये भातकुली तालुक्यातील निंभा ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी उपसरपंचपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. याशिवाय निरूळ गंगामाई ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र ठरल्यामुळे सरपंचपद रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी अनुसूचित जमातीमधून सरपंच निवडला जाणार आहे. अमरावती तालुक्यात धानोरा कोकाटे येथील उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यामुळे नवीन उपसरपंच पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. वरूड तालुक्यात परसोना येथील उपसरपंच जातपडताळणीमध्ये अपात्र ठरल्यामुळे या ठिकाणचे उपसरपंच पद रिक्त होते.
त्यामुळे या उपसरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आदींनी राजीनामे दिल्यामुळे या दोन्ही पदांसाठी निवडणूक होत आहे. दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथील सरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त होते. त्यामुळे या ठिकाणीही नवीन सरपंच निवड केली जाणार आहे. याबाबतचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीने जारी केला आहे.