नव्या कुलगुरूंची निवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:12+5:302021-05-26T04:13:12+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत. परिणामी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत. परिणामी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू ........... चौधरी यांच्याकडे प्रभार देण्यात येईल, अशी माहिती आहे. विद्यमान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात येत आहे. कोरोना संसर्गामुळे कुलगुरू निवडीची प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याची माहिती आहे.
विद्यमान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यास अवघे सात दिवस शिल्लक आहे. मात्र, राजभवनातून नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी समिती गठित करण्यात आलेली नाही. त्यामुळे किमान दोन महिने नवीन कुलगुरू मिळणे कठीण आहे. दुसरीकडे उच्चशिक्षण क्षेत्रातील नामवंतांना या पदाचे वेध लागले आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात फेब्रुवारीत पार पडलेल्या व्यवस्थापन परिषद, विद्वत परिषद यांच्या संयुक्त बैठकीत नवीन कुलगुरू निवड समिती सदस्यपदी दिल्ली येथील बीएचयू आयआयटीचे संचालक संजीवकुमार जैन यांची निवड करण्यात आली. याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे अवलोकनार्थ माहिती पत्राद्वारे पाठविण्यात आली. परंतु, राज्यपालनामित समितीचे अध्यक्ष, सचिवांची अद्यापही निवड झालेली नाही. कुलगुरू निवड समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश अथवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणे अपेक्षित आहे. सचिवपदी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची निवड केली जाते. मात्र, कोरोना संसर्गामुळे राजभवनातून कुलगुरू निवड समितीच्या गठणाकडे दुर्लक्ष चालविल्याचे वास्तव आहे.
----------------------
चौधरींकडे प्रभार?
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कारभार राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू .............. चौधरी यांच्याकडे राजभवनातून सोपविला जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. कुलगुरू चांदेकर यांची यूजीसीच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागेल, असे संकेत आहेत.