एकेका मतासाठी संघर्ष, उशिरापर्यंत रांगा, ७५ टक्क्यांवर मतदान; आज मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:35 AM2023-11-06T10:35:59+5:302023-11-06T10:38:29+5:30
१९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर १७ मध्ये पोटनिवडणूक
अमरावती : जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक, तर १७ मध्ये पोटनिवडणुकीसाठी रविवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या दरम्यान मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. रिद्धपूर, कारलासह काही ग्रापंमध्ये मतदानासाठी मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. या निवडणुकीत सरासरी ७५ टक्क्यांवर मतदान झाल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले. सोमवारी सकाळी १०:०० पासून संबंधित तहसीलमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
डिसेंबर २०२३पर्यंत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतींसह रिक्त सरपंच व सदस्य पदे असणाऱ्या १७ ग्रापंच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. यामध्ये एकेका मतासाठी संघर्ष दिसून आला. सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६२ मतदान केंद्रांवर २५ हजार २२६ मतदारसंख्या होती. यामध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच सकाळी ९:३० पर्यंत ९:३० टक्के, ११:३० पर्यंत २५.९८ टक्के, दुपारी १:३० पर्यंत ४१.७२, दुपारी ३:३० पर्यंत ५५.१२ टक्के म्हणजेच १३ हजार ९०४ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. १७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २२ मतदान केंद्रांवर १३,१०९ मतदारसंख्या होती. यामध्ये दुपारी ३:३० पर्यंत ६,६४५ म्हणजेच ५०.७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये १९ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक अशा एकूण २० सरपंचपदासाठी १०१ उमेदवार रिंगणात होते, तर सदस्यपदासाठी ४८१ उमेदवार होते. या सर्व ठिकाणी संबंधित तालुक्याच्या मुख्यालयी म्हणजेच तहसील कार्यालयात सकाळी १०:०० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
कारला येथे दोन पॅनलमध्ये बाचाबाची
चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला ग्रामपंचायतींमध्ये एका वयोवृद्ध मतदाराचे मतदान हे केंद्रांमधील प्रतिनिधीने केले. त्यावर दुसऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतला. यावरून वातावरण चांगलेच तापले. अखेर दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींना परत पाठविण्यात आले व तेथे नवीन प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले.
रिद्धपूर, कारल्यात उशिरापर्यंत रांगा
१) मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येेथे १० केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती. दुपारनंतर पुन्हा मतदारांची गर्दी वाढल्याने विहीत वेळेत म्हणजेच सायंकाळी ५:३० वाजता ३०० वर मतदारांचे मतदान राहिले होते. त्यांना केंद्रांच्या आत घेण्यात आले. येथे रात्री ९:०० पर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.
२) चांदूर रेल्वे तालुक्यात कारला ग्रामपंचायतीमध्ये दोन पॅनलमध्ये सकाळी बाचाबाची झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दुपारनंतर शेतीकामे आटोपून मतदार आल्याने केंद्रांवर गर्दी वाढली. त्यामुळे येथे उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
या ठिकाणी होणार मतमोजणी
अमरावती तालुक्यात बचत भवन, भातकुली तालुक्यात निवडणूक शाखा, वरूड तालुक्यात नायब तहसीलदार महसूल यांचे दालन, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यातील तहसील कार्यालय, तर धारणी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात सोमवारी सकाळी १०:०० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.