३० नोव्हेंबरला होणार नगराध्यक्षपदाची निवडणूक
By admin | Published: November 19, 2015 12:49 AM2015-11-19T00:49:33+5:302015-11-19T00:49:33+5:30
जिल्ह्यात नवनिर्मित तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ३० नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रतीक्षा : तीन नगरपंचायतींवर महिलाराज
अमरावती : जिल्ह्यात नवनिर्मित तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ३० नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी जिल्हा प्रशासनाद्वारे गुरुवारी अधिकृत नोटीस काढण्यात येणार आहे.
तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती स्थापित करण्यात आल्यात. राज्यात १८० नवनिर्मित नगरपंचायतींसाठी १ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली. तसेच ९ नोव्हेंबरला नगराध्यक्ष आरक्षणपदाची सोडत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाची सोडत अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निघाली. भातकुली व धारणी येथे सर्वसाधारण प्रवर्गातील महिला राखीव असे आरक्षण आहे.
नांदगाव खंडेश्वर येथे सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे. आरक्षण सोडतीनंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा नागरिकांना तसेच इच्छुक नगरसेवकांना होती. या चारही नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत व ३० नोव्हेंबर रोजी निवडणूक होण्याची शक्यता आहे.