११६ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू; तीन बँकांसह, चार तालुक्यांतील खरेदी विक्री संघाचा समावेश
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 25, 2023 05:40 PM2023-09-25T17:40:56+5:302023-09-25T17:41:43+5:30
३० सप्टेंबरपर्यंत होती मुदतवाढ
अमरावती : पावसाळ्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललेल्या ११६ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया आता पाच दिवसांत सुरू होणार आहे. या सर्व संस्थांमध्ये मतदार यादीची प्रक्रिया सुरू असतानाच सहकार विभागाचे आदेश धडकले होते. आता पावसाळा संपत असल्याने १ ऑक्टोबरपासून आहे त्या टप्प्यावरून पुढे प्रक्रिया आरंभ होणार आहे.
जिल्ह्यातील अचलपूर, अमरावती, तिवसा, वरुड व मोर्शी तालुका खरेदी विक्री संघासह ‘ब’ वर्गातील अमरावती मर्चंट कॉपरेटिव्ह बँक, वरुड येथील महात्मा फुले डिस्ट्रिक अर्बन कॉ-ऑपरेटीव्ह बँक, येथील जिजाऊ कमर्शियल कॉ-ऑपरेटिव्ह बँक व अन्य अशा ११६ सहकारी संस्थांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने सहकार विभागाद्वारा मतदार यादीची प्रक्रिया आरंभली होती. मात्र सहकार विभाग व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेशाने निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.