सहकारातील सात संस्थांची निवडणूक प्रक्रिया आजपासून; ३१ मेपर्यंत होती स्थगिती
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 12, 2024 08:31 PM2024-06-12T20:31:07+5:302024-06-12T20:31:23+5:30
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश
अमरावती : जिल्ह्यातील सात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया २९ फेब्रुवारीपासून सुरू होणार असताना एक दिवसापूर्वी सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाने ती ३१ मेपर्यंत स्थगित करण्यात आली होती. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने या संस्थांची निवडणूक प्रक्रिया १३ जूनपासून सुरू होत असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
सहकार विभागातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. याशिवाय सहकार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. आदी कारणांमुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण द्वारा सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावरून ३१ मेपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. तसा आदेश प्राधिकरणाने २८ फेब्रुवारी रोजी काढला होता.
जिल्ह्यात १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती व ४ जूनच्या मतमोजणीनंतर ६ जूनला नोटीफिकेशन निघाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आली आहे. तसे आयोगाने जाहीर केले आहे. दरम्यान, सहकारातील सात संस्थांच्या निवडणुकीची मुदतवाढ ३१ मे रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या ७ जूनच्या आदेशाने पुन्हा या सात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १३ जूनपासून सुरू होणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.