१४ हजार कर्मचाऱ्यांवर निवडणुकीचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:00 AM2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:37+5:30

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६९५ मतदान केंद्रे आहेत. यासाठी सद्यस्थितीत ४९८६ बॅलेट युनिट, ३६६९ कंट्रोल युनिट व ३६३८ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय चाचणी सध्या आटोपली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून ३३०० युनिट, सिद्धार्थनगर जिल्ह्यातून २८८० व बस्ती जिल्ह्यातून ४२८० असे एकूण १०४६० युनिट आणण्यात आलेत.

Election rally on 4,000 employees | १४ हजार कर्मचाऱ्यांवर निवडणुकीचा डोलारा

१४ हजार कर्मचाऱ्यांवर निवडणुकीचा डोलारा

Next
ठळक मुद्देआठही मतदारसंघांत हालचाली गतिमान : विभागीय आयुक्तांद्वारे कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा विभागीय आयुक्तांनी मंगळवारी आढावा घेतला, तर आवश्यक १४ हजार मनुष्यबळाच्या अनुषंगाने आठही मतदारसंघांमध्ये मनुष्यबळाची डेटा एंट्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६९५ मतदान केंद्रे आहेत. यासाठी सद्यस्थितीत ४९८६ बॅलेट युनिट, ३६६९ कंट्रोल युनिट व ३६३८ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय चाचणी सध्या आटोपली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून ३३०० युनिट, सिद्धार्थनगर जिल्ह्यातून २८८० व बस्ती जिल्ह्यातून ४२८० असे एकूण १०४६० युनिट आणण्यात आलेत. एक हजार वाढीव बॅलेट युनिटसाठी तयारी सुरू आहे. प्रत्यक्षात कोणत्या मतदारसंघात जास्त उमेदवार रिंगणात राहतात, यानंतरच बॅलेट युनिटची संख्या निश्चित होणार आहे. तूर्तास आठही मतदारसंघांतील निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व ईव्हीएमचे रॅन्डमायझेशन केल्यानंतर या सर्व ईव्हीएम सर्व मतदारसंघांमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीत आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला अधिकाऱ्यांची एकूण २७ पिंक केंद्रे राहणार आहेत. त्या अनुषंगाने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त पडदानशीन केंद्राच्या अनुषंगाने आठही मतदारसंघांमध्ये तयारी सुरू आहेत. ही सर्व माहिती आयोगाच्या नवीन सॉफ्टवेअरमध्ये संग्रहित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एनआयसी विभागाद्वारे सुरू झालेली आहे. आठही मतदारसंघांतील २९९५ मतदान केंद्रांची पाहणी व त्या ठिकाणी आवश्यक सुविधा आहेत काय, याची खातरजमा केली जात आहे तसेच या सुविधा निर्मितीसाठी संबंधित विभागाला पत्र देण्यात आले. याव्यतिरिक्त वाहतूक व्यवस्थेकरिता लागणाºया वाहनांची माहिती सर्व विभागांकडून मागविण्यात येत आहे. त्याबाबत डेटा सॉफ्टवेअरमध्ये संग्रहित करण्यात येत आहे.
आचारसंहिता उल्लंघन गुन्ह्यांंचा आढावा
सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता उल्लंघनाचे १०७ गुन्हे आठही मतदारसंघांमध्ये दाखल झाले. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत २७ गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणांची काय स्थिती आहे, याचा आढावा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन व पोलीस आयुक्त संजय बाविस्कर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते.
आठ मतदारसंघांसाठी आवश्यक मनुष्यबळ
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६९५ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येकी एक याप्रमाणे २६९५ मतदान केंद्राध्यक्ष, प्रत्येकी तीन असे एकूण ८,०८५ अधिकारी, राखीव ६७४ अधिकारी व अतिरिक्त राखीव २०२१ असे एकूण १३,४७५ मनुष्यबळ या निवडणुकीत लागतील. या संदर्भातील माहिती आयोगाच्या नवीन सॉफ्टवेअरमध्ये एनआयसी विभागाद्वारे दाखल केली जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शासकीय कार्यालयांद्वारे उपलब्ध मनुष्यबळाची माहिती घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

Web Title: Election rally on 4,000 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.