निवडणूक : जप्तीतील १६ लाख रुपये परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:12 AM2019-04-26T01:12:14+5:302019-04-26T01:13:03+5:30
लोकसभा निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या १८ लाख ७५ हजार ५० रुपयांबाबत आवश्यक दस्ताऐवज सादर केल्याने १६ लाखांवर रक्कम परत करण्यात आली, तर दीड लाखांची रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या १८ लाख ७५ हजार ५० रुपयांबाबत आवश्यक दस्ताऐवज सादर केल्याने १६ लाखांवर रक्कम परत करण्यात आली, तर दीड लाखांची रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे.
निवडणूक विभागाच्या पडताळणीदरम्यान रकमेचा निवडणुकीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पडताळणी समितीने रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला. संबंधित सहा जणांना जवळपास १४ लाख रूपयांची रक्कम परत करण्यात आल्याचे कोषागार अधिकारी रवींद्र कुमार लिंगनवाड यांनी दिली. १ लाख ५० हजार रुपये अर्जदार हजर राहू न शकल्याने कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने नाकाबंदी दरम्यान विविध ठिकाणी वाहनांची तपासणी गठित करण्यात आलेल्या पथकामार्फत करण्यात आली. २३ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान १० जणांकडून १८ लाख ७५ हजार ५० रुपयाची रक्कम जप्त करून कोषागारात जमा करण्यात आली होती. पडताळणी समितीने १५ एप्रिल रोजी या रकमेवर सुनावणी घेतली. अर्जदारांचे म्हणणे ऐकल्यानंतर सहा जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली. २५ एप्रिल रोजी पुन्हा तिघांची सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी दोघे हजर झाले. मात्र, एक जण हजर राहिला नाही. उपस्थित दोघांनी पडताळणी समितीला आवश्यक दस्ताऐवज सादर केले. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सचिन लोया यांना ३ लाख २८ हजार ५००, सुभाष चंदनखेडे १ लाख, मनोज फिलिप्स ४ लाख २ हजार, हरिदास सोळंके ७१ हजार, प्रकाश गोयनका २ लाख ३० हजार, श्रीकृष्ण दंदे २ लाख, दगडूलाल चव्हाण १ लाख ७५ हजार ८५९, मो. इरफान मो. रफीक १ लाख ५० हजार अशी जवळपास १६ लाखांवर रक्कम परत करण्यात आली आहे. अन्य एक जण हजर होवू न शकल्याने ही रक्कम कोषागारात जमा असल्याचे कोषागार अधिकार रवींद्र लिंगनवाड यांनी सांगितले.