१३२ ग्रामपंचायतमध्ये सरपंच-उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:43+5:302021-02-12T04:13:43+5:30
पान १ ची फ्लायर अमरावती : सार्वत्रिक निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींपैकी गुरुवारी १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदाची निवड ...
पान १ ची फ्लायर
अमरावती : सार्वत्रिक निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींपैकी गुरुवारी १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये तहसीलदारांनी नेमलेल्या अध्यासी अधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतरच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जाणार आहेत. दरम्यान, वरूडमधील पुसला, घोराड, हातुर्णा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच, तर वडाळा, ईत्तमगाव, पवनी येथे भाजप समर्थित सरपंच विराजमान झाले. राष्ट्रवादीला मांगरूळी आणि महाविकास आघाडीला आमनेर आणि कुरळीचे सरपंचपद मिळाले. देऊतवाड्यात काँग्रेस-भाजप युतीचा सरपंच विराजमान झाल्याचा दावा स्थानिक स्तरावरून करण्यात आला.
दर्यापूर तालुक्यातील करतखेडा येथील पाच सदस्यपदे रिक्त असल्याने सभा गठित झाली नाही. याच तालुक्यातील सासन रामापूर येथे सरपंचपदासाठी अर्ज प्राप्त झाला नाही. अचलपूर तालुक्यातील वडनेर भुजंग येथील सरपंचपद रिक्त राहिले. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजीदेखील १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवडले जाणार आहेत.