जिल्हा परिषदेत 'कही खुशी कही गम'; गट, गणांच्या रचनेत प्रस्थापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 11:38 AM2022-06-03T11:38:38+5:302022-06-03T12:09:24+5:30
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समितीमध्ये येत्या काही दिवसात 'रणसंग्राम' होणार आहे.
अमरावती : जिल्हा पारषद निवडणुकीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समितीमध्ये येत्या काही दिवसात 'रणसंग्राम' होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने क्षेत्ररचना जाहीर केली. मतदारसंघामध्ये थोडाफार बदल तसेच नव्याने मतदारसंघाची भर पडली आहे. त्यासाठी नागरिकांचे आक्षेप मागविण्यात आले आहेत. त्या आक्षेपावर सुनावणी, समाधान झाल्यानंतर मतदारसंघ 'फायनल' होणार आहे.
अमरावती जिल्हा परिषदेतील बहुप्रतिक्षित वाढीव मतदारसंघांचा लेखाजोखा गुरुवारी जिल्हा प्रशासनाने गण व गटाचा प्रारूच रचना प्रसिध्द करून स्पष्ट केला. चांदूरबाजार, वरुड, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली व अचलपूर या सात तालुक्यांमध्ये सात मतदारसंघांच्या जागा वाढल्या आहे. या वाढीव मतदारसंघांमुळे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांची संख्या ६६ तर ११ पंचायत समितीची गणांची संख्या ११२ जाऊन पोहोचली आहे. नवीन वाढलेल्या गटामध्ये चांदूरबाजार तालुक्यात सोनोरी, वरुड तालुक्यात शहापूर, धारणीतील घुटी, दर्यापूरमधील माहुली धांडे, अंजनगाव सुर्जी तालुक्यात खानमपूर पांढरी, भातकुलीत निंभा तर अचलपूर तालुक्यात गौरखेडा कुंभी हा नवा मतदारसंघ तयार झाला आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या गटांसह पंचायत समित्यांच्या गणांची संख्या वाढविण्यात आल्याने त्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्या गटात आणि गणात कोणती गावे समाविष्ट राहतील याची यादी जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दि. २ ला नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर केली. त्यावर जर काही हरकती असतील तर त्या ८ जूनपर्यंत लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर सदर यादीला (गट-गणांचा मसुदा) अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. पूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेची संख्या ५१ तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १०२ होती. आता ती जि.प.सदस्यांची संख्या ५७ तर पं.स.सदस्यांची संख्या ११४ झाली आहे.
यवतमाळमध्ये आठ जागांची भर
यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची घोषणा केली. नवीन रचनेत जिल्हा परिषदेच्या आठ तर पंचायत समितीच्या १६ जागांची भर पडली आहे. आता जिल्हा परिषदेत ६१ ऐवजी ६९ तर पंचायत समितीत २२२ ऐवजी १३८ सदस्य निवडून येणार आहे. नवीन रचनेमुळे कहीं खुशी, कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नवीन गट आणि गणांच्या रचनेत माजी अध्यक्षांना दिलासा मिळाला तर दोन्ही माजी उपाध्यक्षांचे गट गायब झाले आहेत. १६ पैकी आठ तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या १६ जागा वाढल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी गट आणि गणांचा मसुदा प्रसिद्ध केला. हा मसुदा प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.