राज्यातील ८०२ ग्रामपंचायतींमध्ये लोकसभेपूर्वी बिगूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:34 AM2018-12-01T01:34:56+5:302018-12-01T01:35:04+5:30
आयोगाचे आदेश : १७ डिसेंबरला मतदार यादी, जानेवारीत निवडणूक
अमरावती : राज्यात मार्च ते मे २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ८०२ ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. या ठिकाणी १७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. त्यामुळे जानेवारी महिन्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकांपूर्वी गावपातळीवर निवडणुकीचा धडाका राहणार आहे.
यापूर्वी या ग्रामपंचायतींमध्ये प्रभागरचनेसह आरक्षणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आयोगाने आता मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार मतदार यादीच्या प्रभागनिहाय कार्यक्रमामध्ये १ आॅक्टोबरची मतदार यादी ग्राह्य धरून १० डिसेंबरला प्रारूप यादी जाहीर करण्यात येणार आहे. यावर १४ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. यावर सुनावणी झाल्यावर १७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीमध्ये लेखनिकाच्या चुका, दुसºया प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आलेली आहेत, अशा ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे गावागावांतील राजकारणात ऐन थंडीत पेटणार आहे.
जातवैधतेचे प्रस्ताव महत्त्वाचे
निवडणुकांमध्ये राखीव प्रभागात निवडणूक लढविणाºया उमेदवारांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र किंवा जातवैधता समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोच पुराव्यादाखल जोडावी लागते. यासाठी इच्छुक उमेदवारांनी या प्रमाणपत्रासाठी संबंधित तहसील कार्यालयाद्वारे समितीकडे प्रस्ताव पाठविल्यास त्यांना याबाबतची पोच व काही कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी प्रस्ताव दाखल असे करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.