विद्युत सहायकांचा अपघात की घातपात ?
By admin | Published: June 19, 2016 12:02 AM2016-06-19T00:02:37+5:302016-06-19T00:02:37+5:30
म.रा. विद्युत कंपनीच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय सहायकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही,
अचलपूर : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
अचलपूर : म.रा. विद्युत कंपनीच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय सहायकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने उपजिल्हा रुग्णालय, परिसरात गुरुवारपासून तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी पोलीस ठाण्याला मृताच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. तक्रारी अर्ज पोलिसांनी चौकशीत ठेवला आहे. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा मृताच्या नातेवाईकांमध्ये होती.
गुरुवारी दुपारी येथील देवडी चौक भागातील पोलीस चौकीजवळील विद्युत खांबावर चढून विद्युत पुरवठा सुरळीत करीत असताना तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह संचारल्याने पंकज राजकुमार मोरे (२६, रा. कुष्ठा) हा विद्युत सहायक शॉक लागून ठार झाला. पण नातेवाईकांनी पंकजच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. संबंधित जबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली होती.
वीज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व ठाणेदार नरेंद्र ठाकरे, सुदर्शन झोड, सुनील काळे आदींनी नातेवाईकांची समजूत काढली. शेवटी शुक्रवारी मृत विद्युत सहायक पंकजचे वडील राजकुमार मोरे यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी अर्ज दिला. गुरुवारी अंदाजे १ ते १.३० वाजेच्या सुमारास देवडी परिसरातील विद्युत पोलवर वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी चढण्यास सांगितले. पण मुख्य विद्युत डीबीवरील विद्युत पुरवठा खंडित केला नाही. विद्युत पुरवठा खंडित आहे की नाही, याची पडताळणी केली नाही. सदर खांबावर चढून काम करीत असताना विद्युत शॉक लागल्याने ते गतप्राण झाले. (तालुका प्रतिनिधी)
देवडी चौक परिसरात गजानन वाघमारे, सुनील पांडेन, रवी टोम्पे व पंकज मोरे हे चार विज कर्मचारी काम करत होते. जेथून विद्युत पुरवठा खंडीत केला होता. त्या डीपीवर एक कर्मचारी थांबला होता. पूर्ण लाइन बंद होती. देवडी परिसर कमर्शियल (दुकाने भरपूर आहेत) आहे. त्या दुकानांमध्ये इन्व्हेटर आहे. त्यामधून एखादेवेळी विद्युत तारेत करंट आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पंकज मोरे ला शॉक लागला.
राजेंद्र गिरी (कार्यकारी अभियंता)
शवविच्छेदन झाले
पंकजच्या वडीलांनी अचलपूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातलगांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. विद्युत सहाय्यकाचा अपघात नसून घातपातच असल्याची चर्चा अचलपुरात सुरु आहे.
विद्युत कर्मचाऱ्यांसाठी सेक्युरिटी अॅक्ट असल्याने लगेच गुन्हा दाखल करता येत नाही. घडलेल्या घटनेची माहीती घेण्यासाठी विद्युत निरीक्षक येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल.
नरेंद्र ठाकरे (ठाणेदार)
पोलीस ठाणे, अचलपूर