१५ रुपयांत मिळालेल्या मीटरला ५१ हजारांचे वीज बिल; कोरोनाकाळातील झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 10:07 PM2020-11-26T22:07:57+5:302020-11-26T22:08:24+5:30
Amravati News महावितरणने दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथील रहिवासी असलेल्या मजूर दाम्पत्याला ५१ हजार १४० रुपयांचे वीज बिल दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महावितरणने दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथील रहिवासी असलेल्या मजूर दाम्पत्याला ५१ हजार १४० रुपयांचे वीज बिल दिले आहे. दारिद्र्यरेषेखालील या कुटुंबाचा अवघ्या तीन सीएफएल बल्बचा वीजवापर आहे. कोरोनाकाळातील हे अव्वाच्या सव्वा बिल भरायचे कसे, या विचारांनीच त्यांचा हात-पाय गळाले आहे.
सुखदेवराव मालखेडे (६५) असे सदर व्यक्तीचे नाव आहे. भूमिहीन असलेले सुखदेवराव हे मजुरी करतात. गावात मिळालेल्या तीन खोल्यांच्या घरकुलात ते पत्नीसह वास्तव्यास आहेत. त्यांच्याक़डे विजेच्या उपकरणाच्या नावावर तीन सीएफएल बल्ब आहेत. तेदेखील दिवसा बंद असतात आणि रात्रीदेखील निद्राधीन होण्यापूर्वी बंद केले जातात. यावरून त्यांचा वीजवापर हा केवढा असेल, याची कल्पना यावी. सुखदेवरावांनी शेवटचे वीज बिल लॉकडाऊनपूर्वी १६०० रुपये भरले होते. त्यानुसार काही हजारांपर्यंत बिल अपेक्षित असताना, महावितरणने ५० हजारांवर बिल देऊन त्यांना ‘हायव्होल्टेज’ धक्का दिला आहे.
हिन्यांपासून त्यांच्या वीज मीटरचे आकडे महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतले नाही. अद्ययावत मोबाईल नसल्याने महावितरणच्या आवाहनानुसार वीज मीटरचे छायाचित्र पाठविता आले नाही. आता आलेले अवाढव्य बिल आवाक्याबाहेरचे आहे.
पेपरला देता? मीटर मिळणार नाही
बिल मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी घरी आलेल्या वीज कर्मचाऱ्यापुढे सुखदेवरावांकडे तक्रार दिली. मात्र, घटनाक्रम पेपरला द्याच, असे आव्हान सदर कर्मचाऱ्याने दिले. आधी सांगितले असते, तर मीटर बदलून दिले असते. आता मात्र आम्ही काहीच करणार नाही, असे म्हणत सदर कर्मचाऱ्याने हात वर केल्याचे सुखदेवराव मालखेडे यांनी सांगितले.
आपले बिल आपली जबाबदारी
कोरोनाकाळातील अवाढव्य वीज बिल माफ होणार, असे सांगितले जात होते. मात्र, त्या भूमिकेपासून फारकत घेत खुद्द वीजमंत्र्यांनी लोकांना बिलाच्या माफीबाबत तूर्तास कोणतीही भूमिका घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वीज बिल भरावेच लागणार हे स्पष्ट आहे. मात्र, त्यासाठी घर गहाण ठेवायचे का, असा प्रश्न मालखेडे यांनी उपस्थित केला.
विजेचा लपंडाव
कोकर्डा फीडरवरील लेहेगाव रेल्वे हे शेवटचे गाव आहे. त्यामुळे विजेच्या लपंडावाचा सर्वाधिक त्रास लेहेगाव येथील नागरिकांना होतो. त्याकडे महावितरण दुर्लक्ष करीत असल्याबाबत नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.