कोरडवाहू शेतकऱ्यांवर वीज कंपनीची वक्रदृष्टी
By admin | Published: June 9, 2016 12:24 AM2016-06-09T00:24:32+5:302016-06-09T00:24:32+5:30
पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे.
अचलपूर : वीजजोडणीसाठी झिजवावे लागतात उंबरठे
अचलपूर : पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. अशाही परिस्थितीशी दोन हात करीत शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत कार्यालयात पायपीट करीत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील तीन-चार वर्षांपासून अचलपूर तालुक्यात नापिकीची स्थिती आहे. त्यामुळे अधिकाधीक जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाने यासाठी धडक सिंचन योजना सुरू केली. या योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच वीजजोडणी तत्काळ स्वरुपाची केल्याने इतर शेतकरी मात्र सिंचन सुविधेपासून वंचित राहिले आहेत. तालुक्यात आतापर्यंत २ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज दाखल केले. त्यातील कित्येक शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात पडले आहेत. विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज जोडण्या देण्याचे काम कासवगतीने करीत आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ ६४,६३० हेक्टर आहे. त्यापैकी ५४,११६ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. यात ३३ टक्के जमीन मध्यम तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. यातील ३० ते ३५ टक्के शेती सद्यस्थितीत संरक्षित ओलीताखाली आल्याची माहिती आहे. संथगतीने होणारा शेतीप्रयोगाचा आलेख असाच राहिल्यास पुढे ५० वर्ष तालुक्यातील शेती ओलिताखाली येण्याची शक्यता नाही, असे मत जाणकार व अनुभवी शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बागायती शेती करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असतांना अनावश्यक कागदपत्रे आणि मन:स्ताप शेतकऱ्यांच्या इच्छेला बाधक ठरत आहे.
यामुळे मागेल त्याला शेततळे व वीजजोडणी तत्काळ देण्याची गरज असल्याचे मत बबल्या पोटे, गजानन मेहरे, सुभाष फुकटे, पांडुरंग काटोलकर (बोपापूर), मुरलीधर घुलक्षे, नरेंद्र राऊत, अतुल गणगणे, नीलेश मालगे, सुरेश मोहोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. (शहर प्रतिनिधी)