वीज पडल्याने भिंतीचे तुकडे दीडशे फुटापर्यंत उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:41 PM2018-02-12T22:41:51+5:302018-02-12T22:42:21+5:30
वादळी पाऊसादरम्यान वीज पडून एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची पॅराफीट वॉल तुटून खाली कोसळली, तर भिंतीच्या विटा-सिमेंटचे तुकडे दीडशे फुटांपर्यंत उडून दुसऱ्यांच्या घरात जाऊन पडले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वादळी पाऊसादरम्यान वीज पडून एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची पॅराफीट वॉल तुटून खाली कोसळली, तर भिंतीच्या विटा-सिमेंटचे तुकडे दीडशे फुटांपर्यंत उडून दुसऱ्यांच्या घरात जाऊन पडले. रविवारी रात्री मोतीनगरात घडलेल्या या थरारक घटनेत विजेच्या अतितिव्र आवाजाने पंधरा मिनिंटापर्यंत नागरिकांच्या कानठळ्या बसल्या होत्या, तर नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. विजेच्या प्रभावाने अनेक घरातील वीज उपकरणे निकामी होऊन लाखो रुपयांचे नुकसानसुध्दा झाले आहे.
रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मोतीनगर स्थित डहाणे नगरातील रहिवासी रवि मनोहर भुते (२०) यांच्या कुटुंबीयांतील आठ सदस्य रात्री घरात टीव्ही पाहत बसले असताना अचानक वीज कोसळून सर्व परिसर अंधारमय झाला. भुते यांच्या घरावर वीज पडल्याची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली. यामध्ये भुते यांच्या घरासह अनेक नागरिकांच्या घरातील वीज उपकरणे निकामी झाले.
ग्रीन नेटला छिद्र पाडून प्लास्टिकच्या भांड्याला तडे
मोतीनगरातील रहिवासी किशोर निरवान यांच्या घरापर्यंत भुते यांच्या घरावरील विटा-सिमेंटचे तुकडे उडाले. निरवान यांच्या घराच्या आवारातील हिरव्या जाळीला भेदून वीज पडल्याने प्लास्टिकचे भांडेसुध्दा फुटले. तसेच विजेमुळे मनीष इंगळे यांच्यासह अनेक घरांतील टीव्ही, फ्रिज, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक व घरातील विद्युत वायरिंंग जळाली.