कुंपणाला वीज प्रवाह; शेतकऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:50 PM2017-11-17T23:50:51+5:302017-11-17T23:51:52+5:30
वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडल्याप्रकरणी महावितरणने शुक्रवारी एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडल्याप्रकरणी महावितरणने शुक्रवारी एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला. देविदास उंकडराव ठाकरे (रा. बोडणा) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
राखीव वनक्षेत्रालगत शेतकरी कुंपणाला वीज प्रवाह सोडून शेतातील पिकांचे संरक्षण करतात. मात्र, शेतकºयांची ही शक्कल वन्यप्राण्यांच्या जिवावर बेतते. काही दिवसांपूर्वी वाघ, बिबट्याचे कुंपणाच्या वीज प्रवाहाने नाहक बळी गेले. त्यामुळे जंगलाशेजारील शेतात कुंपणाला वीज प्रवाह सोडू नये, असे फर्मान शासनाने काढले आहेत. शेताच्या कुंपणाला वीज प्रवाहविरोधात धडक कारवाईची जबाबदारी वनविभाग आणि महावितरण कंपनीकडे सोपविली. त्यानुसार पोहरा वनक्षेत्रांतर्गत शेत कुंपणाची तपासणी केली असता, बोडणा येथे कुंपणाला वीज प्रवाह सोडण्यात आल्याचे चमूच्या लक्षात आले. महावितरणचे सहायक अभियंता अतुल बोकाडे, पोहºयाचे वनपाल विनोद कोहळे यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. विद्युत कायदा २००३ (सुधारित २००५) कलम १३५ अन्वये देविदास ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करून वीज तार, बल्ब आदी साहित्य जप्त करण्यात आले.
उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या आदेशानुसार वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात शेत कुंपण तपासणी कारवाई निरंतरपणे सुरू राहील, असे वनविभागाने स्पष्ट केले. सुधीर खुजावरे, पी.बी. शेंडे, बाबूराव येवले, आर. के. खडसे, अनिरा उके, पी.टी. आखरे आदी वनकर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.