डॉक्टरांनो, जनरेटरची व्यवस्था करून ठेवा; महावितरणचे रुग्णालयांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:51 AM2023-01-04T11:51:07+5:302023-01-04T11:55:05+5:30
Mahavitaran Employee Strike : आजपासून तीन दिवस वीज कर्मचारी संपावर
अमरावती : समांतर वीज वितरण परवान्याच्या विरोधात ३ जानेवारी मध्यरात्रीपासूनच महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे राज्यव्यापी संपावर गेले आहेत. त्यामुळे संपादरम्यानवीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास वेळ लागण्याची शक्यता महावितरणने वर्तवली आहे. त्यामुळे रुग्णालय तसेच इतर अत्यावश्यक सुविधा पुरविणाऱ्या विभागांनी अशा वेळी पर्यायी जनरेटरची व्यवस्था करण्याच्या सूचनावजा पत्र महावितरणने दिली आहेत. तसेच ग्राहकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शविण्यासाठी तसेच ऊर्जा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील ऊर्जाक्षेत्रातील अधिकारी अभियंता, कर्मचारी हे संपावर जाणार आहेत. या संपामध्ये जिल्ह्यातील महावितरण कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे.
३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून तर ६ डिसेंबरपर्यंत तब्बल तीन दिवस हा संप चालणार आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याची सर्व खबरदारी घेतल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु तरीही या काळात वीज गुल झाल्यास ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. या संपामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील एकूण २९ संघटनांचे कर्मचारी, अभियंते व अधिकारी सहभागी आहेत.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व माहिती देण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचेही महावितरणने सांगितले. संप काळात कर्मचारी, अभियंते व अधिकारी सहभागी झाल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये, त्यांना तक्रार दाखल करता यावी तसेच तसेच वीजवाहिनी तुटणे, शॉर्टसर्किट होणे आदींबाबत माहिती देण्यासाठी सहनियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ग्राहकांना सहनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६३८७३ या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. संपकाळात वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व खबरदारी घेतली गेली असली, तरी वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास थोडा कालावधी लागेल या दृष्टीने रुग्णालये किंवा अत्यावश्यक सेवेतील विभागांनी पर्यायी व्यवस्था म्हणजेच जनरेटर किंवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.