हत्ती दत्तक योजना फसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 05:00 AM2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:01:08+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री आणि सुंदरमाला नामक चार हत्तीणी आहेत. या चारपैकी कुणालाही किंवा या चौघींनाही दत्तक घेता येते. ही दत्तक योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांना कोणीही दत्तक घेतलेले नाही. या चौघीही पालकांच्या शोधात आहेत. पण, त्यांना पालक मिळालेले नाहीत.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत हत्ती दत्तक योजना फसली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत राज्यमंत्री बच्चू कडूंचा अपवाद वगळता या हत्तींना दत्तक घ्यायला कोणीही पुढे आलेले नाही.
२२ फेब्रुवारी २०१८ ला स्थापना दिनी हत्ती दत्तक देण्याचा निर्णय मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने घेतला. २१ हजार ५०० रुपयांमध्ये एक महिन्याकरिता एक हत्ती दत्तक देण्याचे निश्चित केले गेले.
ज्या कुणाला एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीकरिता हत्तीला दत्तक घ्यायचे असेल, त्याला त्यापटीत रक्कम मोजावी लागते. ही दत्तक विधानाची रक्कम व्याघ्र संवर्धन फाउंडेशनकडे भरावी लागते. हत्ती दत्तक घेणाऱ्याला त्या रकमेवर ८० जी अंतर्गत आयकरात सूटही देण्याची तरतूद आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री आणि सुंदरमाला नामक चार हत्तीणी आहेत. या चारपैकी कुणालाही किंवा या चौघींनाही दत्तक घेता येते. ही दत्तक योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांना कोणीही दत्तक घेतलेले नाही. या चौघीही पालकांच्या शोधात आहेत. पण, त्यांना पालक मिळालेले नाहीत.
‘वॉन्ट टू ॲडॉप्ट अ’ मेलघाट का हाथी?’
ग्रीन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ‘वॉन्ट टू ॲडॉप्ट अ मेलघाट का हाथी?’ असे फलक व्याघ्र प्रकल्पाच्या कोलकास परिसरात झाडावर लागले आहेत. याच ठिकाणी जयश्री, सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी वास्तव्याला आहेत. या दत्तक योजनेतून हत्तीला लागणारा आहार, त्यावर शासनाचा होणारा खर्च हत्ती स्वतःच काढणार आहे.
चंपाकली नशीबवान
चंपाकली मात्र यात नशीबवान ठरली. एक महिन्यापुरते का होईना, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या रूपाने चंपाकलीला पालक मिळाले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक वर्षापूर्वी एक महिन्याकरिता चंपाकलीला दत्तक विधानाची रक्कम भरून दत्तक घेतले होते. तेव्हा त्यांच्या अर्धांगिनी नयना कडू यादेखील या दत्तक विधानात सामील होत्या.
पालकाची ओळख हत्तीला
हत्ती दत्तक घेतल्यानंतर दत्तक कालावधीत तो त्या पालकांच्या नावाने ओळखला जातो. या कालावधीत दत्तक हत्तीला भेटण्याची मुभा त्या पालकांना राहते. याकरिता पालक मेळघाटात पोहोचल्यानंतर त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था व्याघ्र प्रकल्पाकडून विनामूल्य केली जाते. तथापि, दत्तक हत्ती पालकांना आपल्या घरी नेता येत नाही.