हत्ती, जेसीबीने तुडविले उभे शेत
By Admin | Published: July 3, 2017 12:30 AM2017-07-03T00:30:50+5:302017-07-03T00:30:50+5:30
तालुक्यातील चुनखडी येथे रविवारी दुपारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतात हत्तीच्या फिरविले.
आदिवासींमध्ये रोष : व्याघ्र अधिकाऱ्यांची हुकूमशाही
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील चुनखडी येथे रविवारी दुपारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतात हत्तीच्या फिरविले. तसेच जेसीबीच्या सहाय्याने अडीचशे सीटीपीएस, पोलीस, वनकर्मचाऱ्यांचा ताफ्यात खड्डे करायला सुरुवात केल्याने संतप्त आदिवासींनी अधिकाऱ्यांना गावबंदी केल्याची माहिती मिळाली. परिसरातील आठ गावांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून मोठा अनर्थ होण्याचे चिन्हे आहेत.
तालुक्यातील चुनखडी, नवलगाव, खडीमल, बिच्छूखेडा, घाणा, माडीझडप आदी खेड्यांमध्ये अनेक वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करून पाचशेवर आदिवासी शेती करत आहेत. यातील काहींना शासकीय जमिनीचे पट्टे देण्यात आले आहेत. काही प्रतीक्षेत आहेत. त्या परिसरातील गावे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागामार्फत येतात. शुक्रवारी चुनखडी येथे व्याघ्र अधिकारी सीटीपीएस कमांडो, पोलिसांसह अडीचशे वनकर्मचाऱ्यांचा ताफा हत्ती आणि जेसीबी घेऊन धडकला आदिवासींना कुठलीच पूर्व सूचना न देता थेट सोनाजी सावलकर, पुनाजी जमुनकर, सुरेश कासदेकर, सुधीर धिकार या चार आदिवासी शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी आदी २५ हेक्टर शेत हत्तीने तुडविले, तर जेसीबीने शेतात खड्डे केले.
जारिदा येथे आज आदिवासी धडकणार
चिखलदरा : या प्रकाराने आदिवासींमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी ही कारवाई झाल्यावर रविवारी दुपारी १२ वाजता पुन्हा हा ताफा सहायक वनसवरक्षक मिलिंद तोरो, ठाणेदार मडावी आदी धडकले होते. आज सोमवारी आदिवासी पुन्हा धडक देणार आहेत.
हत्ती आणि जेसीबीच्या जोरावर आदिवासींचे पेरलेले शेत नष्ट करण्याचा सपाटा वनाधिकाऱ्यांनी सुरू केल्याने सोमवारी चुनखडी नवलगाव घाणा बिच्छूखेडा खंडुखेडा माडीझडप आदी गावातील आदिवासी जारीदा वनपरिक्षेत्र कार्यालयात धडकल्याची माहिती काँगे्रसचे तालुकाध्यक्ष मिश्रिलाल झाडखंडे यांनी दिली आदिवासींच्या पोटावर मारून उपासमारी करणाऱ्या अधिकाऱ्या विषयी संताप व्यक्त करण्यात येत असून मोठी ठिणगी उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चुनखडी आणि परिसरातील आदिवासींची पेरणी केलेली शेतजमीन हत्ती आणि जेसीबीने नष्ट करण्यात आली. यासंदर्भात आपण आदिवासींसोबत असून पालकमंत्री आणि वनमंत्र्यांना तक्रार करणार आहे.
- सुनंदा काकड, जि.प.सदस्य, सलोना सर्कल