मेळघाटातील हत्ती जाणार पंधरा दिवसांच्या सुटीवर; कोलकासची सफारी राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 12:51 PM2023-01-03T12:51:27+5:302023-01-03T12:52:38+5:30
पंधरवड्यात होणार ‘चोपिंग’
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पअंतर्गत सिपना वन्यजीव विभागअंतर्गत कोलकास संकुल येथील हत्ती सफारी १० ते २४ जानेवारीदरम्यान १५ दिवस चोपिंगकरिता बंद ठेवण्यात येणार आहे.
कोलकास संकुल येथे लक्ष्मी, जयश्री, चंपाकली आणि सुंदरमाला अशा या चार हत्तिणी असून वर्षभर त्या हत्ती सफारीकरिता पर्यटकांच्या सेवेत उपलब्ध असतात. मात्र, वर्षातील हिवाळा ऋतूमध्ये १५ दिवस त्यांना आरामासाठी सुटी दिली जाते. यादरम्यान त्यांच्या पायाची चोपिंग केली जाते. चोपिंग ही त्यांच्याकरिता एकप्रकारे आयुर्वेदिक मसाज आहे. या १५ दिवसांमध्ये सफारी व इतर कामे हत्तींना दिले जात नाही.
पर्यटकांनी १० ते २४ जानेवारीदरम्यान हत्ती सफारी बंद राहणार असल्याची नोंद घ्यावी, असे सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्य भारती यांनी कळविले आहे.
२८ जडीबुटींच्या मिश्रणाद्वारे मसाज
चोपिंग करताना संपूर्ण पारंपरिक पद्धतीने हिरडा, बिबा, बरडा, सुंठ, फल्ली तेल, डिकामाली, ओवाफूल, नीला तोता, अस्मान तारा, गुगळी, कुचला, तुरटी, सागरगोटी, आंबेहळद यांसारख्या २८ जडीबुटींपासून चुलीवर मिश्रण तयार करून हत्तीच्या पायांना शेक (मसाज) दिला जातो. त्यावेळी हत्तींना पूर्णपणे आराम दिला जातो.