वर्धा नदी नाव दुर्घटनेतील अकराही मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:52+5:302021-09-17T04:17:52+5:30
फोटो पी १६ वरूड कॉमन वरूड (अमरावती) : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे १४ सप्टेंबर रोजी वर्धा नदीच्या ...
फोटो पी १६ वरूड
कॉमन
वरूड (अमरावती) : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे १४ सप्टेंबर रोजी वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून एकूण ११ जण बुडाले होते. त्यातील तीन मृतदेह घटनेच्या दिवशी सापडले होते, तर उर्वरित आठ मृतदेह गुरुवारी सापडले आहेत. बुडालेले सर्व ११ जणांचे मृतदेह गवसल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. घटनेच्या दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दलाची पथके तसेच जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी अविरत मदतकार्य करीत होते.
मृतांमध्ये नारायण भोमाजी मटरे (५९), किरण विजय खंडाळे (२८), वंशिका प्रदीप शिवणकर (२), मोनाली उर्फ मोहनी सुखदेव खंडाळे (११), अदिती सुखदेव खंडाळे (१३), निशा नारायण मटरे (२२), पीयूष तुळशीदास मटरे (८), अतुल गणेश वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (१९), अश्विनी अमर खंडाळे (२५), पूनम प्रदीप शिवणकर (२४) यांचा समावेश आहे.
घटनेच्या दिवशी श्याम मनोहर मटरे (२५) व राजकुमार रामदास उईके (४५) हे दोघे नदीतून पोहत बाहेर आल्याची माहिती मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन दिले. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितच मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
////////////
२२ दिवसात संसार उद्ध्वस्त
मृतांपैकी एका दाम्पत्याचे नुकतेच लग्न झाले असल्याची माहिती पुढे आहे. अतुल वाघमारे (२५) व वैशाली अतुल वाघमारे (१९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. अवघ्या २२ दिवसांत त्यांच्या सुखी संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अतुल वाघमारे याचे २२ ऑगस्ट रोजी वरूड तालुक्यातील गाळेगाव येथील वैशाली मटारे या तरुणीशी लग्न झाले. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र, १४ सप्टेंबर रोजी झुंज येथील वर्धा नदीतील बोट अपघातात दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी पहाटेच त्यांचे मृतदेह हाती लागले.
//////
तिसऱ्या दिवशी सापडले आठही मृतदेह
मंगळवारपासून सुरू असलेल्या शोधकार्याला गुरुवारी दुपारी ४ वाजता ब्रेक लागला. बुधवारी दिवसभर शोधकार्य केल्यानंतर निराशेने शोध पथक झोपी गेले. गुरुवारी पहाटे ५.३० पासून शोधकार्याला पुन्हा सुरुवात झाली. यात सर्वप्रथम पीयूष तुलसीदास मटरे या बालकाचा मृतदेह घटनस्थळापासून ७ ते ८ किमीवरील हातुर्णानजीक सापडला. पाठोपाठ सहाही मृतदेह पथकाच्या हाती लागले. दुपारी ४ वाजता एका मुलीचा मृतदेह सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
//////////////
घटनास्थळावरच झाले शवविच्छेदन
मृतदेहांना दुर्गंधी येत असल्याने प्रशासनाने तीर्थक्षेत्र झुंज येथेच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष बदनावरे यांनी सात मृतदेहांचे घटनास्थळावर, तर एकाचे रुग्णालयात शवविच्छेदन केले आणि तेथून मृतदेह प्रशासनाने त्यांच्या गावी रुग्णवाहिकेतून पोहचवून दिले. यावेळी नातेवाईकांच्या रुदनाने उपस्थितांना गहिवर दाटून आला होता.