आरटीईत पात्र; शाळेचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:07 PM2018-04-07T22:07:38+5:302018-04-07T22:07:38+5:30
यंदाच्या सत्रासाठी इयत्ता पहिलीत आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एका विद्यार्थिनीचा आरटीई प्रवेश कोट्यातून नंबर लागला. परंतु, त्या विद्यार्थिनीचे पालक प्रवेश करण्यासाठी शुक्रवारी सदर शाळेत गेले असता, नमूद पत्त्यावर ती शाळाच अस्तिवात नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली.
सचिन मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : यंदाच्या सत्रासाठी इयत्ता पहिलीत आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एका विद्यार्थिनीचा आरटीई प्रवेश कोट्यातून नंबर लागला. परंतु, त्या विद्यार्थिनीचे पालक प्रवेश करण्यासाठी शुक्रवारी सदर शाळेत गेले असता, नमूद पत्त्यावर ती शाळाच अस्तिवात नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यांनी थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठून प्रभारी गटशिक्षणाधिकाºयांकडे लेखी तक्रार सादर केली.
आशा-मनीषा मंदिर परिसरातील रहिवासी प्रतीक्षा रवींद्र सोळंके हिच्या २५ टक्के शाळा प्रवेशाच्या आॅनलाइन अर्जात पहिल्या क्रमाकांवर गांधीनगर येथील दर्यापूर इंग्लिश मिडियम स्कूलला पालकांनी पसंती दिली होती. बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये आपणास २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया २०१८ अंतर्गत सादर केलेल्या माहितीच्या आधारे येथील दर्यापूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाळेचा क्रमांक कोड २७०७०८१०९१७ असा आहे. या ठिकाणी प्रवेश मिळाल्याची आॅनलाइन सूचना सदर विद्यार्थिनीच्या पालकांना प्राप्त झाली. त्यांचा अर्ज क्रमांक १८ एएम ००१२४० असा असून, आरक्षणामध्ये एसटी अशी नोंद आहे. विद्यार्थिनीचे वडील रवींद्र सोळंके हे प्रतीक्षासह अन्य नातेवाइकांसोबत गांधीनगर येथे गेले असता, तेथे दर्यापूर इंग्लिश मिडियम स्कूलचा पत्ताच नव्हता.ही बाब त्यांच्यासाठी धक्कादायक होती. यासंदर्भाची लेखी तक्रार शुक्रवारी सकाळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश घाटे यांच्याकडे पालकाने सादर केली होती, तेव्हा दर्यापूर इंग्लिश मीडियम स्कूल ही तालुक्यातील सासन येथे स्थानांतरित करण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. एवढ्या लांब प्रवेश घेणे शक्य नसल्याची खंत रवींद्र सोळंके यांनी व्यक्त केली असून, मुलीच्या भविष्याची चिंता शिक्षण विभागानेच दूर करावी, असे आवाहन केले आहे.
दर्यापूर इंग्लिश मिडियम स्कूल सासनला स्थानांतरित झाली आहे. पत्ता दुरुस्त करण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली नसल्याने यादीत नाव कायम राहिले. प्रतीक्षाला नजीकच्या साईनगर येथील शाळेत प्रवेश घेता येईल, असे तिच्या पालकांना कळविले आहे.
- प्रकाश घाटे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, दर्यापूर