विद्यापीठात ‘पेड बाय मी’ प्रकरणी अडीच लाखांचा अपहार; चौकशी अहवालानंतरही दोषीवर कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:56 PM2022-06-24T17:56:52+5:302022-06-24T18:00:12+5:30
तब्बल तीन वर्षांचा कालावधी होऊनही अडीच लाखांच्या या अपहारप्रकरणी दोषीवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. एस. अस्वार यांनी ‘पेड बाय मी’ प्रकरणी अडीच लाखांचा अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मात्र, प्रशासनाने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्यामुळे केवळ चौकशीचा फार्स रंगविला जात आहे. आता याप्रकरणी नव्याने प्र-कुलगुरू डॉ. विजय कुमार चौबे यांच्याकडे चौकशीची धुरा सोपविली आहे.
रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी जानेवारी २०१९मध्ये रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. एस. अस्वार यांनी ‘पेड बाय मी’मध्ये अपहार केल्याची तक्रार नोंदविली होती. सन २०१२ ते २०१९ या कालावधीत रसायनशास्त्र एम. एस्सी.च्या विद्यार्थ्यांच्या पावतीवर डॉ. अस्वार यांनी देयकांची उचल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनातील वित्त व लेखा विभागाचे उपकुलसचिव डॉ. नितीन कोळी यांनी याप्रकरणी चौकशी केली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या नावे अडीच लाखांची देयके उचलल्याची धक्कादायक बाब अहवालातून पुढे आली आहे. याला तब्बल तीन वर्षांचा कालावधी होऊनही अडीच लाखांच्या या अपहारप्रकरणी दोषीवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. दरम्यान, डॉ. अस्वार हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याची माहिती आहे. आता प्र-कुलगुरू चौबे हे याप्रकरणी चौकशी कधी करणार, अहवाल कधी सादर करणार, हे गुलदस्त्यात आहे.
काय आहे ‘पेड बाय मी’ प्रकरण
विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात एम. एस्सी.चे विद्यार्थी प्रोजेक्ट सादर करण्यासाठी कम्पाऊंड टेस्टींग देतात. त्यासाठी रकमेची तरतूद केली जाते. प्रोजेक्टसाठी अगाेदर विद्यार्थी पैसे खर्च करतात आणि तो सादर करताना खर्चाच्या पावत्या फाईलसोबत जोडतात. परंतु, फाईलमध्ये विद्यार्थ्यांनी जोडलेल्या पावत्या या डॉ. अस्वार यांनी स्वत:कडे राखून ठेवल्या.
त्यानंतर या पावतीच्या आधारे विद्यापीठातून देयके काढण्यात आली. एकंदरीत सात वर्षांत अडीच लाख रुपये देयकांपोटी उचलण्यात आल्याचे चौकशी अहवालातून पुढे आले आहे.