इमर्जन्सीसाठी डॉक्टरांची अनास्था ?

By Admin | Published: January 17, 2017 12:02 AM2017-01-17T00:02:55+5:302017-01-17T00:02:55+5:30

बदलत्या काळात आजारांचे आणि रोगाचे स्वरूपही बदलले आहे. कधी कोणाला कोणता आजार होईल आणि कधी इमर्जन्सी उद्भवेल, सांगता येत नाही.

Emergency doctor's disfigurement? | इमर्जन्सीसाठी डॉक्टरांची अनास्था ?

इमर्जन्सीसाठी डॉक्टरांची अनास्था ?

googlenewsNext

रूग्णांचा कैवारी कोण? : मध्यरात्रीनंतर आजार उद्भवल्यास अक्षरश: फरफट
वैभव बाबरेकर अमरावती
बदलत्या काळात आजारांचे आणि रोगाचे स्वरूपही बदलले आहे. कधी कोणाला कोणता आजार होईल आणि कधी इमर्जन्सी उद्भवेल, सांगता येत नाही. विशेषत: लहान मुलांबाबत तर फारच ‘अलर्ट’ रहावे लागते. मात्र, कधी-कधी रात्री-अपरात्री वैद्यकीय सेवेची गरज भासते. मग, नागरिक रूग्णाला घेऊन या रूग्णालयातून त्या रूग्णालयात फिरतात. मात्र, अलिकडच्या काळात ‘इमर्जन्सी’ सेवेबाबतची काही डॉक्टरांची अनास्था तीव्रतेने जाणवू लागली आहे.
मध्यरात्रीनंतर एखाद्या वयोवृद्धाची, लहान मुलाची प्रकृती बिघडल्यास, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास किंवा अपघात घडल्यास तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतीलच, याची काही शाश्वती उरलेली नाही. घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत रूग्णाचे नातलग रूग्णाला घेऊन या रूग्णालयातून त्या रूग्णालयात वाऱ्या करीत असतात. पण, त्यांच्या वेदना पाहून क्वचितच डॉक्टरांना पाझर फुटतो. अनेकप्रसंगी योग्य उपचार न मिळाल्याने अनेकदा रूग्णांना प्राण देखील गमावावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. समजा इमर्जन्सीमध्ये एखादे डॉक्टर गवसलेच तर ते नक्कीच भक्कम फी घेणार, हे गृहित धरावे लागते. सध्या स्पेशालिस्ट्सचा काळ आहे. प्रत्येक अवयवाचे तज्ज्ञ वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्या-त्या भागाचा आजार झाल्यास त्या-त्या डॉक्टरांकडे जाण्याची पद्धत आपसुकच रूढ झाली.

अपॉर्इंटमेंटविना डॉक्टर मिळेनात
अमरावती : अनेकदा तर एखाद्या डॉक्टरकडून नियमित उपचार घेणाऱ्या डॉक्टरकडूनच इमर्जन्सी सेवा देताना हयगय होत असल्याचे दिसून येते. बालरोगतज्ज्ञांकडूनही पालकांच्या भावना, त्यांची काळजी समजून न घेता अशी अनास्था दाखविली जाते, हे विशेष.
इतकेच नव्हे तर शहरातील काही डॉक्टर पैशाच्या हवास्यापोटी त्यांचा खासगी व्यवसाय फुलवित आहेत. अगदी छोट्याशा क्लिनिकपासून सुरू झालेल्या व्यवसायाचा वटवृक्ष झाला की रूग्णांबद्दलची त्यांची आस्था संपून जात असल्याचे चित्र आहे. शहरातील काही प्रतिष्ठित डॉक्टरांच्या रुग्णालयात रूग्णांच्या रांगा लागलेल्या असतात. काही डॉक्टरांकडे नंबर लावण्यासाठी मध्यरात्रीपासूनच रांगेत उभे राहावे लागते. काही ठिकाणी तर अपॉईन्टमेंट घेतल्याशिवाय डॉक्टर भेटत सुद्धा नाहीत. अनेक दवाखान्यांमध्ये तब्बल तीन ते चार दिवसांनी रूग्णांचा नंबर लागत असल्याचे चित्रही पाहायला मिळते.
डॉक्टरांवर विश्वास ठेऊन रूग्ण मोठ्या आशेने त्यांचा आधार शोधतात. मात्र, अपरात्री संकट ओढवल्यास हा ‘धन्वंतरी’मदतीला धावून येईलच, याची अजिबात शाश्वती राहिलेली नाही. इमर्जन्सी सेवा देण्याचे कर्तव्य वास्तविक डॉक्टरांनी बजावायला हवे. मात्र, असे क्वचितच होताना दिसते. वैद्यकीय व्यावसायिकांनी निदान त्यांच्या माणुसकीच्या धर्माचे पालन तरी करावे, अशी अपेक्षा रूग्णांनी केल्यास त्यात गैर ते काय?

इमर्जन्सी सेवेसाठी मोजावे लागते जादा शुल्क
मध्यरात्रीनंतर एखाद्या गंभीर रुग्ण खासगी डॉक्टरकडे गेला तर त्याला इमर्जन्सी सेवेसाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागते. रुग्ण डॉक्टरांच्या दाराशी जातात. मात्र, तेथील कर्मचारी आधी पैसे द्या नंतरच डॉक्टर येतील, असेच भाष्य करतात, अशा अनेक प्रसंगांना नागरिकांना सामोरे जावे लागते.

मध्यरात्रीनंतर शहरातील
मेडिकल बंद
मध्यरात्रीनंतर शहरातील मेडिकल बंद होत असल्याने किरकोळ दुखापत किंवा आकस्मिक आजारी पडणाऱ्यांना औषधीदेखील उपलब्ध होत नाहीत. दररोज कित्येक रूग्णांचे नातेवाईक शहरातील मेडिकल शोधत असतात. केवळ रुग्णालयाशी संलग्न मेडिकल सुरू असल्यामुळे रुग्णांना जरा तरी दिलासा मिळतो. अन्यथा त्यांचे हाल काय होतील, याची कल्पनाच केलेली बरी.

बाळाची प्रकृती मध्यरात्री बिघडली होती. फॅमिली डॉक्टरांच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दोन ते तीन दवाखाने पालथे घातले. पण, उपचार झाले नाहीत. अनेक कारणे सांगितली गेली. तासाभरानंतर एका डॉक्टरने उपचार केले.
- राजा जगताप,
नागरिक, प्रसादनगर

इमर्जन्सी आरोग्यसेवा शहरात तातडीने उपलब्ध होत नाही. अनेक दवाखाने फिरल्यानंतर एखादा डॉक्टर उपलब्ध होतो. शहरात वैद्यकीय पेशाला केवळ व्यावसायिक स्वरूप आले आहे. जादा रक्कम मोजून देखील रात्री-बेरात्री उपचार मिळत नाही, हे रूग्णांचे दुर्देवच आहे. यावर अंकुश लागायला हवा.
- नरेंद्र कापसे, नवाथेनगर.

डॉक्टर एक माणूस आहे. त्यांना खासगी आयुष्य असते. रुग्णांना तत्काळ सेवा हवी असते. वास्तविक जबाबदार डॉक्टर त्यांच्या अनुपस्थितीत दुसऱ्या डॉक्टरकडे जबाबदारी सोपवित असतात. शहरातील काही डॉक्टरांबद्दलच्या तक्रारी असतील तर त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.
- वसंत लुंगे, अध्यक्ष, आयएमए

Web Title: Emergency doctor's disfigurement?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.