झेडपीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गायब, प्रशासनही अनभिज्ञ
By जितेंद्र दखने | Published: June 24, 2023 05:40 PM2023-06-24T17:40:40+5:302023-06-24T17:40:57+5:30
अपघात झाला तर करायचे काय?
अमरावती : जिल्हा परिषद इमारतीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गत कित्येक वर्षांपासून गायब झाली आहे. अग्निरोधक यंत्रे (फायर बॉटल) कालबाह्य झाली आहेत. वाळूच्या बादल्या व इतर सुरक्षा साहित्य अडगळीत पडले आहे. दुर्दैवाने जिल्हा परिषद इमारतीत काही अपघात घडला, तर प्रशासन काय करणार. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा भार वाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीची व त्यात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतीत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
या इमारतीच्या आपत्कालीन सुरक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या उपाययोजना कार्यान्वित नसल्याचे वास्तव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. पाणीपुरवठा, आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागात असलेले अग्निरोधक यंत्र अडगळीत पडले आहे. जलसंधारण विभागात उपलब्ध वाळूच्या बादल्या पूर्णत: सडल्याचे दिसून आले. आग विझवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी अग्निरोधक यंत्रे निरुपयोगी झाली तर बहुतांश विभागात खबरदारीच्या उपाययोजनाच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन ठिकाणी असलेल्या यंत्रांवर नमूद करण्यात आलेली वापरण्याची मुदत संपली असून, हे कालबाह्य यंत्र आग विझवण्यात कितपत सक्षम आहे हा प्रश्न आहे.
एकाही विभागात नाही यंत्रणा
जिल्हा परिषद मुख्यालय असलेल्या बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, पंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, जलसंधारण, पाणीपुरवठा व स्वच्छता, शिक्षण, कृषी, भांडार, विभाग आदी विभागात खबरदारीसाठी अग्निरोधक यंत्रणाच अस्तित्वात नाही.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात महत्वाच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निरोधक यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपत्कालीन सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोनजा करण्याचे निर्देश ॲडिशनल सीईओमार्फत बांधकाम विभागाला दिले आहेत.
- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी