शेतकरी, महिला गटांचे बळकटीकरणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:10 AM2021-06-29T04:10:03+5:302021-06-29T04:10:03+5:30
अमरावती : दर्जेदार उत्पादन निर्मितीसह विपणन कौशल्य व तांत्रिक बाबींच्या प्रशिक्षणातून शेतकरी व महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध ...
अमरावती : दर्जेदार उत्पादन निर्मितीसह विपणन कौशल्य व तांत्रिक बाबींच्या प्रशिक्षणातून शेतकरी व महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.
कृषी विभाग, आत्मा व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात झाली. त्याचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार प्रवीण पोटे, आमदार किरण सरनाईक, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, कृषी सहसंचालक शंकर तोटेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत एक जिल्हा एक उत्पादन, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया असे अनेक योजना- उपक्रम गटांसाठी राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ शेतकरी व महिला गटांना मिळवून द्यावा. त्यासाठी योजनेची माहिती, तांत्रिक बाबीविषयी वेळोवेळी प्रशिक्षण, प्रचार- प्रसार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आवश्यक कार्यशाळा आदींचे आयोजन नियमित करावे. योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.