दारूअभावी गुंगीच्या औषधांवर भर; अमरावती जिल्ह्यात २६ औषधविक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:34 PM2020-04-25T17:34:23+5:302020-04-25T17:35:58+5:30
सध्या दारूची दुकाने बंद असल्याने व्यसनाधीन नागरिक नशा करण्याकरिता गुंगीचे (झोप येण्याचे) औषध वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
संदीप मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात औषध प्रशासन विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६ किरकोळ औषधविक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही कारवाई लॉकडाऊन कालावधीत औषध प्रशासन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त मनीष गोतमारे यांनी केली आहे. २२ मार्च ते २४ एप्रिल दरम्यान एफडीएच्या पथकाने जिल्ह्यातील ११५ मेडिकल स्टोअर तपासले. यादरम्यान नियमांचे उल्लघंन करणाºया किरकोळ औषधविक्रेत्यांना नोटिसी बजावण्यात आल्या.
सध्या दारूची दुकाने बंद असल्याने व्यसनाधीन नागरिक नशा करण्याकरिता गुंगीचे (झोप येण्याचे) औषध वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या औषधींची मागणीही वाढली आहे. त्याअनुषंगाने या औषधांची गैरमागार्ने विक्री होऊ नये, कुठल्याही औषधविक्रेत्याने सदर औषधाची विक्री डॉक्टराच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय करू नये, असे तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी बजावले.
गुंगीच्या औषधींचे पाच ते सहा कंपन्यांचे ब्रॅन्ड मार्केटमध्ये उपलब्ध असल्याची माहिती पुढे आली. औषधविक्री करताना ग्राहकांना बिल देण्यात येते की नाही, औषधी दुकानांची स्वच्छता ठेवण्यात येते का तसेच चढ्या दराने सॅनिटायझरची विक्री होत आहे का, यासंदर्भातही तपासणी करण्यात आली. चढ्या दराने सॅनिटायझरच्या विक्रीप्रकरणी दोन ठिकाणी कारवाईसुद्धा करण्यात आल्याची माहिती गोतमारे यांनी दिली.
कोरोना आजारासंदर्भात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांचीसुद्धा मागणी वाढली आहे. त्याचीसुद्धा डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय विक्री करू नये, असे औषधविक्रेत्यांना बजावण्यात आले. जिल्ह्यात १४०० किरकोळ, तर ४०० घाऊक औषधविक्रेते आहेत.
बाजारातील साठा केला कमी
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा स्टॉक मार्केटमध्ये कमी करण्यात आलेला आहे. तूर्तास शहरातील बाजारात पाच हजार टॅबलेट उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाकडे हे औषध मुबलक प्रमाणात आहे. जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये ३० ते ४० हजार टॅबलेट उपलब्ध असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दारूची दुकाने बंद असल्याने गुंगी आणणाऱ्या औषधांची मागणी वाढली. औषधविक्रेत्यांनी त्या डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय विकू नये. सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा साठा बाजारात कमी करण्यात आला असला तरी शासकीय रुग्णालयात हे औषध मुबलक प्रमाणांत उपलब्ध आहे.
- मनीष गोतमारे, प्रभारी सहायक आयुक्त, औषध प्रशासन विभाग, अमरावती