सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह दर्जेदार पुनर्वसनावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:14 AM2021-09-18T04:14:24+5:302021-09-18T04:14:24+5:30
अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच आता पूर्णेच्या खोऱ्यातील टेंभा गावाजवळ पेढी नदीवर पेढी बॅरेज ...
अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच आता पूर्णेच्या खोऱ्यातील टेंभा गावाजवळ पेढी नदीवर पेढी बॅरेज उपसा सिंचना योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विविध प्रकल्पांना चालना देऊन जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याबरोबरच दर्जेदार पुनर्वसनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
चांदूर बाजार तालुक्यातील राजुरा गावाजवळील राजुरा नाल्यावरील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी १९३ कोटी ८१ लाख रुपये किमतीला सुधारित प्रशासकीय मान्यता नुकतीच मिळाली. त्याचबरोबर आता पेढी उपसा सिंचन योजनेच्या ३६१ कोटी ६१ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने ही महत्वाची कामे वेग घेणार आहेत. प्रकल्प उभारताना ते काम दर्जेदार होण्यासह पुनर्वसनाची कामेही उत्तम व्हावीत, असे उद्दिष्ट आहे. दर्जेदार पुनर्वसनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे राज्यमंत्री यांनी सांगितले.
बॉक्स:
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यात टेंभा गावाच्या पूर्वेस पेढी नदीवर पेढी बॅरेज उपसासिंचन योजना प्रस्तवित करण्यात आली. या बॅरेजची एकूण साठवण क्षमता ४.६५ दलघमी इतकी आहे. जिवंत जलसाठा ४.६० व मृत जलसाठा ०.०५ दलघमी आहे. बॅरेजची लांबी १२० मीटर इतकी असून १२६.५० मीटर आकाराचे उभी उचल पद्धतीने आठ दरवाजे राहणार आहेत. बॅरेजच्या पायाच्या ठिकाणी परागम्य मऊ भूस्तर असल्याने बॅरेज डिफॉर्गम वॉलसह रूफ फाऊंडेशनवर प्रस्तावित आहे. डाव्या काठावर १०० मीटर लांबीचा व उजव्या काठावर ८१ मीटर लांबीचा माती भराव प्रस्तवित आहे. दोन्ही बाजूस महत्तम उंची ९.५० मीटर इतकी आहे. प्रकल्पाचा लाभ सात गावांतील २ हजार २३२ हेक्टर शेतीला, तसेच पेयजल व मत्स्त्यव्यवसायाला मिळणार आहे.
बॉक्स:
वितरणासाठी बंद नलिका प्रस्तावित
उपसा सिंचन योजनेचे स्वरूप पाहता, प्रकल्पाद्वारे सिंचित करावयाच्या क्षेत्रासाठी बंद नलिका वितरण प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी प्रकल्पातून पाणी उपसून ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे वितरण कुंडात सोडण्यात येऊन पुढे बंद नलिका वितरण प्रस्तावित केलेली आहे. उपसा सिंचनकरिता पंपगृह हे बॅरेजच्या उजव्या काठावर बॅरेजपासून साधारण ५०० मीटर अंतरावर प्रस्तावित आहे.