विदर्भात वाघांच्या अभिरक्षणासाठी ट्रॅप कॅमे-यांवर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 07:09 PM2020-01-01T19:09:17+5:302020-01-01T19:09:32+5:30
गतवर्षी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे.
गणेश वासनिक
अमरावती : गतवर्षी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, अधिक वाढीसह अभिरक्षणावर भर दिला जात आहे. त्यानुसार विदर्भात एकूणच व्याघ्र प्रकल्पात जानेवारीमध्ये ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या सूचनांचे याद्वारे पालन करण्यात येणार आहे.
विदर्भात ताडोबा-अंधारी, मेळघाट, पेंच, नवेगाव बांध, बोर, टिपेश्वर, काटेपूर्णा, ज्ञानगंगा आदी व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात वाघांच्या अभिरक्षणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी २०१८ मध्ये जाहीर केलेल्या व्याघ्र गणनेच्या आकडेवारीनुसार राज्यात ३१२ वाघ असल्याची नोंद करण्यात आली आहे. आता देशभरात २०२० मध्ये सर्वांगीण व्याघ्र गणना होणार आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांचे अभिरक्षण, संवर्धनावर भर दिला जाणार आहे.
राज्यात वाघांनी ४०० पेक्षा अधिक आकडेवारी गाठावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परिणामी वाघांची शिकार, अवयवांची तस्करी रोखण्यासाठी प्रामुख्याने मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रक ल्पात ‘टायगर क्राइम सेल’ आणि ‘टायगर प्रोटेक्शन फोर्स’ गठित करण्यात आले. वाघांच्या बारीकसारीक हालचाली टिपण्यासाठी अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसविण्याबाबत एनटीसीएच्या सूचना आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्प संचालकांनी ट्रॅप कॅमे-यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार २.७० लाख हेक्टरवर
मेळघाटात वाघांची संख्या नेमकी किती, याबाबत निश्चिती होऊ शकली नाही. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ४५ पेक्षा अधिक वाघ असल्याचे व्याघ्र गणनेअंती स्पष्ट झाले. हा व्याघ्र प्रकल्प द-याखो-यांत विस्तारलेला आहे. व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ २.७० लाख हेक्टर आहे. यात १.५० लाख हेक्टर कोअर परिसर, तर बफर झोन १.२० लाख हेक्टर आहे. मेळघाट बफर, गुगामल, अकोट व सिपना अशा चार विभागांत मेळघाट व्याघ्र प्रकल्प विस्तारलेला आहे.
-----------------
मेळघाट व्याघ्र प्रक ल्पात हल्ली ४०० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. नव्याने ३०० कॅमे-यांची आवश्यकता असून, एनटीसीएकडे प्रस्ताव पाठविला आहे. निधी प्राप्त होताच ट्रॅप कॅमेरे बसविले जातील.
- एम.एस. रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.