‘त्या‘ कर्मचाऱ्याने केला ५० मिनिटात वीजपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:14 AM2021-09-18T04:14:42+5:302021-09-18T04:14:42+5:30
अमरावती : वीजपुरवठा खंडित झाला तर नाही. त्या गोष्टी महावितरण कर्मचाऱ्यांना ऐकाव्या लागतात. अनेकदा शिवीगाळपण केली जाते. ...
अमरावती : वीजपुरवठा खंडित झाला तर नाही. त्या गोष्टी महावितरण कर्मचाऱ्यांना ऐकाव्या लागतात. अनेकदा शिवीगाळपण केली जाते. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत दुरुस्त केलेला वीजपुरवठा मनाला समाधान देऊन जातो. याचा नुकताच अनुभव तंत्रज्ञ रोशन चोखट यांनी राहटगाव वितरण केंद्र तिवसा फिडरचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करताना घेतला. या कामाची वरिष्ठ अधिकारी दखल घेत त्याचे कौतुक केले.
रविवारी रोशन त्या केंद्रावर एकटा कार्यरत होता. सायंकाळी ६.३० वाजता 'महालक्ष्मी' बसणार तेवढ्यात २२० केव्ही अमरावती उपकेंद्रातून जाणारे तिवसा फीडरवर ब्रेकडाऊन आल्याने वडगाव माहोरे, राजुरा, मासोद, राजुरा काॅलनी, इंदला, घातखेडा ही गावे अंधारात गेली. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाटात वीजपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी मानणाऱ्या रोशनने फॉल्ट शोधायला सुरूवात केली आणि मासोदा स्टोन क्रशरजवळ वीज वाहिनी तुटल्याचे आढळले. अगदी गिट्टी खदानाच्या काटावरील ११ मीटर लांबीच्या खांबावर तुटलेली वाहिनी एकट्याने दुरुस्त करणे रात्रीच काय दिवसालाही शक्य न होणारे होते. परंतु रोशनने खांबावर चढून कट पॉंईट ओपन करून एका उच्च दाब वाहिनीच्या ग्राहकांना वेगळे करून इतर संपूर्ण गावाचा वीजपुरवठा सुरळीत केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता सहकाऱ्यांच्या मदतीने तुटलेली वाहिनी जोडण्यात आली.