कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:14+5:302021-04-09T04:13:14+5:30
चांदूर बाजार : शासकीय कर्मचारी घरभाडे भत्ता घेऊनही मुख्यालयी राहत नाही. मात्र, वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा ...
चांदूर बाजार : शासकीय कर्मचारी घरभाडे भत्ता घेऊनही मुख्यालयी राहत नाही. मात्र, वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव यांनी तक्रारीत केला आहे.
शासनाचा भरमसाठ पगार असून, आपल्या कामाप्रति जबाबदार नसलेल्या ग्रामीण भागात काम करणारे ग्रामसेवक, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. तसेच अनेक ग्रामसेवक वेगवेगळी कारणे सांगून मुख्यालय सोडून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात. त्यामुळे शासकीय कार्यलयात अनेक समस्या निर्माण होत आहे. आरोग्य सेवकांच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावच्या काळात देखील काही आरोग्य सेवक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत लोकविकास संघटनेचे पदाधिकारी गोपाल भालेराव यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार शासकीय कर्मचारी घरभाडे भत्ता उचल करूनही मुख्यालयी न राहणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी घरभाडे मिळविण्यासाठी खोटे दस्तऐवज सादर केले, अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करावी, अशी तक्रार ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि तहसीलदारांकडे दाखल केली होती. मात्र, त्याचा तपास रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोट
कोरोनामुळे ग्रामसभेला आजपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. जेव्हा ग्रामसभा घेण्यात येतील तेव्हा याबाबत ठराव घेण्याच्या सूचना सर्व ग्रामसेवक सरपंचांना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहे.
- प्रफुल्ल भोरखडे, गटविकास अधिकारी, चांदूर बाजार