पालिका आयुक्तांवर शाई फेक; कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 03:57 PM2022-02-09T15:57:11+5:302022-02-09T17:27:13+5:30
अमरावतीत मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याच्या निषेधार्त महानगरपालिका कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन पुकारले.
अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाद्वारा महिलांद्वारे आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करीत असल्याचे मनपा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी सांगितले. अग्निशमन विभाग व सुरू असलेले आरोग्य केंद्र वगळता मुख्यालय व पाचही झोनच्या एक हजारांवर कर्मचारी मनपा गेटसमोर एकवटले व कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकदिवसाचे कामबंद आंदोलन सुरू केले.
अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण चिघळले आहे. शहरातील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यास गेलेल्या महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर दोन महिलांनी शाई फेकल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवि राणा यांच्या नेतृत्त्वात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १२ जानेवारी रोजी बसविण्यात आला होता. मात्र, तो प्रशासनाने रात्रीतून उचलल्याने राजकीय वाद विकोपाला गेला. त्याच अनुषंगाने काही महिलांनी महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याची ही घटना घडल्याची चर्चा होत आहे. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिघळलेल्या स्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेचा निषेध नोंदवत महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.
हे कृत्य अमरावतीच्या संस्कृतीला शोभनीय नाही. ज्यांनी काेणी केले असेल, त्यांच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे. झालेल्या प्रकरणाचा मी जाहीर निषेध करतो.
चेतन गावंडे, महापौर
अधिकाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही
महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शासकीय अधिकाऱ्यांवर करण्यात येणारे असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला. बुधवारी शहरातील राजापेठ उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर काही समाजकंटकांनी काळी शाई फेकल्याचे वृत्त माझ्या निदर्शनास आले. निवडणुकांच्या तोंडावर शहरातील वातावरण अशांत करण्याचा आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. मात्र अमरावतीकर याला बळी पडणार नाहीत. शांतता आणि सलोखा कदापीही भंग होणार नाही, असा आपणास विश्वास असल्याचे ना. ठाकूर यांनी म्हटले आहे.
- ना. यशोमती ठाकूर