मेळघाटात व्याघ्र संवर्धनासह आदिवासींना रोजगार, पाचशे युवक-युवतींना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 05:16 PM2017-09-04T17:16:59+5:302017-09-04T17:20:27+5:30

आदिवासी युवक-युवतींना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशिक्षणाअंती रोजगार हा अभिनव उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबवित आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत पाचशे तरूण-तरूणींना रोजगाराची संधी मिळाली असून परप्रांतातील नामांकित संस्थांमध्ये आदिवासी युवकांनी वेगळा ठसा उमटवला आहे.

Employment in Tiger conservation, tribal people in Melghat, opportunity for five hundred youths | मेळघाटात व्याघ्र संवर्धनासह आदिवासींना रोजगार, पाचशे युवक-युवतींना संधी

मेळघाटात व्याघ्र संवर्धनासह आदिवासींना रोजगार, पाचशे युवक-युवतींना संधी

Next

- गणेश वासनिक। 

अमरावती, दि.9 - आदिवासी युवक-युवतींना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशिक्षणाअंती रोजगार हा अभिनव उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबवित आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत पाचशे तरूण-तरूणींना रोजगाराची संधी मिळाली असून परप्रांतातील नामांकित संस्थांमध्ये आदिवासी युवकांनी वेगळा ठसा उमटवला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे व्याघ्र संवर्धन आणि संरक्षण हे प्रमुख उद्देश असले तरी ‘व्हिलेज इको टुरिझम’ अंतर्गत आदिवासींना रोजगार मिळवून देणे हेदेखील त्यांचे उत्तरदायित्व आहे. त्याअनुषंगाने व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी यांनी जनविकास योजनेंतर्गत १८ ते ३४ वर्षे वयोगटातील आदिवासी युवक-युवतींसाठी ‘प्रथम’ नामक संस्थेच्या माध्यमातून निवासी प्रशिक्षण सुरू केले आहे. जुलै ते सप्टेंबर २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत १५० आदिवासी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. एका उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प १६ हजार रूपये खर्च करीत आहे.  त्याअनुषंगाने मेळघाटातून दर महिन्याला ३५ आदिवासी युवक- युवतींची चमू प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे पाचशे आदिवासी युवक-युवती आणि महिलांना रोजगार मिळाला आहे. 
राजकोट, लोणावळा, शिर्डी, पुणे, महाबळेश्वर, मुंबई, बडोदा आदी मोठ्या शहरातील हॉटेल, रिसोर्टमध्ये आदिवासी युवक नोकरीवर आहेत. हॉटेल मॅनेजमेंट ईलेक्ट्रिशियन, वातानुकुलित यंत्र दुरूस्ती, शिवणकाम, तीन महिन्यांचे वेल्डिंग प्रशिक्षण तर आॅटोमोबाईलचे ७५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा खर्च ते रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी व्याघ्र प्रकल्पाने घेतली आहे. प्रशिक्षणाअंती रोजगारासाठी पाठविलेल्या आदिवासी युवक, युवतींबाबतची माहिती घेण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. आॅगस्ट महिन्यात नवी बॅच प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आली.

आदिवासी महिलांना घरबसल्या रोजगार
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणा-या ११८ गावांमधील आदिवासी महिलांना घरबसल्या रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट येथील सी.के.लाख युनिटसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार महिलांना लाखेच्या बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बांगड्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य सदर एजन्सी पुरवीत असून बांगड्या खरेदी करण्याची जबाबदारीदेखील याच एजन्सीकडे आहे. आतापर्यंत २२९ आदिवासी महिलांनी प्रशिक्षण घेतले असून दरदिवसाला १५० ते २०० बांगड्या निर्मितीतून आदिवासी महिला मिळवीत आहेत. 

मेळघाटात ज्या गावांमध्ये ‘व्हिलेज ईको टुरिझम कमिटी’अस्तित्वात आहे, त्या गावांत आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत पाचशे जणांना रोजगार मिळाला असून लवकरच पोल्ट्री फार्म युनिटची संकल्पना आहे. नागपूर विद्यापीठासोबत तसा करार केला जाणार आहे.
- एम.एस.रेड्डी,
क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

Web Title: Employment in Tiger conservation, tribal people in Melghat, opportunity for five hundred youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.