बचत गटांचे सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 12:03 AM2016-01-11T00:03:49+5:302016-01-11T00:03:49+5:30
राज्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे,
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे : विभागीय बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन
अमरावती : राज्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी ग्रामविकास विभागाचे व शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी बचत गटांना उद्योगाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदस्यांना बँकांकडून शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकास, रोजगारहमी योजनामंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना प्रचार व प्रसिद्धीअंतर्गत सायन्सस्कोर मैदानावर १० ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित विभागीय महिला मेळावा तसेच बचत गटांद्वारे उत्पादित वस्तुंच्या ‘विकास गंगोत्री’ या विभागीय स्तरावरील प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पालकमंत्री पोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून खा.अडसूळ, आमदार भिलावेकर, बच्चू कडू, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर, रमेश बुंदिले, महापौर नंदा, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, यवतमाळ जि.प.च्या अध्यक्ष आरती फुफाटे, बुलडाण्याच्या अलका खंडारे, वाशिमच्या सोनाली जोगदंड, अकोल्याचे शरद गवई तसेच निवेदिता चौधरी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, विभागीय आयुक्त राजुरकर जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, मल्लिनाथ कलशेट्टी, प्रकल्प संचालक प्रमोद कापडे, उपायुक्त आर.यू.अवचार, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जि.प. उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती वृषाली विघे, लीना बनसोड आदींची उपस्थिती होती.
चूल आणि मूल शाप नसून वरदानच !
चूल आणि मूल हे महिलांसाठी शाप नसून वरदानच आहे. कारण चूल आणि मूल सांभाळणे हे फार मोठे जबाबदारीचे काम आहे. त्यात कमीपणा नसावा, आपले पाल्य संस्कारक्षम निर्माण व्हावेत यासाठी ही जबाबदारी आवश्यक आहे, असे सांगून ना.मुंडे म्हणाल्या, समाजातील माता, स्त्री सक्षम झाल्या पाहिजेत. स्त्रियांना नतमस्तक होऊन जबाबदारीच्या कामाचा श्रीगणेशा झाला पाहिजे. स्त्री समाजाचे पालन पोषण, सुसंस्कारित समाज निर्मिती करते, यासाठी त्यांच्या हाताला ताकद देण्याची आवश्यकता आहे. त्यांना निर्णय घेण्याची शक्ती द्या, त्याचा ते निश्चितच सदुपयोग करतील, असे ना.मुंडे म्हणाल्या.