ठाणेदारासमोरच लाच देण्यासाठी तक्रारदारास केले प्रोत्साहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:00 PM2018-09-18T22:00:35+5:302018-09-18T22:01:19+5:30
अंजनगाव सुर्जीच्या ठाणेदारास पकडण्यासाठी अकोला एसीबी पथकाने २९ आॅगस्ट रोजी सापळा रचला. मात्र, अर्धवट कारवाईमुळे एसीबी पथकाला परत जावे लागले. त्यानंतर १२ दिवसांनी एसीबी पथकाने रायटरसह तीन खासगी व्यक्तींविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंजनगाव सुर्जीच्या ठाणेदारास पकडण्यासाठी अकोला एसीबी पथकाने २९ आॅगस्ट रोजी सापळा रचला. मात्र, अर्धवट कारवाईमुळे एसीबी पथकाला परत जावे लागले. त्यानंतर १२ दिवसांनी एसीबी पथकाने रायटरसह तीन खासगी व्यक्तींविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दिलेल्या एसीबीच्या फिर्यादीनुसार, ठाणेदार पाटील यांच्यासमोर त्यांच्याच कक्षात अब्दुल अजीज शेख याने तक्रारदारास लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अकोला एसीबी पथकाने अंजनगाव सुर्जी येथील तक्रारदाराच्या लेखी तक्रारीवरून २९ आॅगस्ट रोजी पडताळणी सापळा रचला होता. प्रकरणातील दोन्ही खासगी आरोपी ठाणेदार पाटील यांच्याकडून कारवाई होऊ देणार नाही, याची हमी देत आधी दिलेल्या ३० हजारांव्यतिरिक्त उर्वरित रकमेसाठी तक्रारदाराशी वारंवार मोबाइलद्वारे संपर्क करीत होते. पंचांसमक्ष या दोेन खासगी इसमांची पडताळणी झाल्यानंतर ठाणेदार पाटील यांच्या पडताळणीसाठी ३० आॅगस्ट रोजी एसीबीने सापळा रचला. मात्र, ठाणेदार पाटील यांच्या कक्षात एसीबीचे तक्रारदारांसह गैरअर्जदार तिडके व अजीज यांच्यासमक्ष पडताळणी कारवाई करण्यात आली. दरम्यान, एसीबी तक्रारदाराविरुद्ध गुन्हे दाखल न करण्याविषयी बोलणी केली. यावेळी शेख अजीज यांनी एसीबी तक्रारदाराला लाचेची रक्कम पाटील यांना देण्यास त्यांच्यासमक्ष प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. एकंदरीत एसीबीच्या तक्रारीतील गैरअर्जदार ठाणेदाराविरुद्ध एसीबी पथकाची पडताळणी सुरू असल्याचा संशय सागर शिवणकरला आला. तक्रारदाराची बंद खोलीत अंगझडती घेतली. तक्रारदाराच्या गळ्यात व्हॉइस रेकॉर्डर निदर्शनास आले. रायटरने ठाणेदाराच्या कक्षात जाऊन सापळा रचल्याची माहिती दिली. ही सर्व घटना एसीबीने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
तुला पाहून घेईन; ठाणेदाराची दमदाटी
तक्रारदाराने एसीबी सापळा लावल्याचे ठाणेदाराला कळताच, त्यांनी तक्रारदारास मागील प्रकरणात तत्काळ अटक करून भादंविचे कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हे दाखल केले व त्याच्याजवळील तीन मोबाइलसुद्धा जप्त केले. तक्रारदाराकडे न्यायालयाचा अटकपूर्व जामीन असतानासुद्धा हातकडी लावली. त्यानंतर दोन कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी घेऊन ठाण्यातून हाकलून दिले. तुला पाहून घेईन, अशी दमदाटीसुद्धा केल्याचे एसीबीच्या तक्रारीत नमूद आहे.
ठाणेदारावर पोलीस विभागाकडून कारवाई नाही
ठाणेदाराच्या कक्षात व त्यांच्यासमक्ष खासगी इसमाने तक्रारदारास लाच मागितल्याचे एसीबीच्या तक्रारीत स्पष्ट नमूद आहे. याशिवाय ‘तक्रारदारास पाहून घेईन’ असा उल्लेख असतानासुद्धा संबंधित ठाणेदारांविरूद्ध वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, हे विशेष.
आमचा तपास गोपनीय असून, यासंबंधी कारवाईचे अधिकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आहेत. अंजनगावच्या ठाणेदाराचा अहवाल त्यांना पाठविला जाईल.
- श्रीकांत धिवरे, एसीबी पोलीस अधीक्षक, अमरावती