शिक्षकांच्या सेवानिवृत्ती प्रश्नासाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे
By Admin | Published: November 4, 2015 12:16 AM2015-11-04T00:16:12+5:302015-11-04T00:16:12+5:30
राज्याच्या शिक्षण विभागात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये सेवेत रुजू झालेले ...
विद्यापीठात चर्चा : शिक्षण संघर्ष समितीने निवेदनातून केली मागणी
अमरावती : राज्याच्या शिक्षण विभागात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये सेवेत रुजू झालेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी रविवारी राज्याचे शालेय, तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना साकडे घालून मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. गत १४ वर्षांपासूनच्या लढ्याला न्याय प्रदान करण्यात यावा, अशी मागणी शिक्षण संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.
ना. विनोद तावडे हे रविवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नवीन विद्यापीठ कायदा तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी आले असता त्यांना सदर मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विदर्भ जुनी पेन्शन योजना कृती समिती व शिक्षण संघर्ष समितीच्या विभागीय अध्यक्ष संगीता शिंदे ( बोंडे), सचिव विकास दिवे यांनी ना. विनोद तावडे यांच्या पुढ्यात शिक्षकांच्या संघर्षमय मागण्यांचा पाढा वाचला.
ही समस्या केवळ विदर्भापुरती मर्यादित नसून ती राज्यभरातील शिक्षकांची समस्या आहे. त्यामुळे शासनाने सामाजिक जाण ठेवून १ नोंव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णयाचा दाखला देत बहुतांश बाबी या शिक्षकांच्या बाजूने असल्याचा दावा केला. यावेळी संगीता शिंदे, विकास दिवे, शरद तिरमारे, विलास डव्हे, रुपेश टाले, सुरेश मोलके, देवेंद्र झेले, नितीन तायडे, नीलय बोंडे, प्रभाती ठवकर, श्वेता वाकोडे, संतोष बोरकर, प्रवीण जायदे, प्रवीण गुल्हाणे, नीलेश नागापुरे, हारुण शहा, सुशील इखनकर, ललित चौधरी, गोवर्धन बेदोडकर, सचिन अंजीकर, अमोल भोजने आदींनी ना.तावडे यांच्या पुढ्यात जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्यासाठी साकडे घातले. (प्रतिनिधी)
इर्विन चौकात धरणे आंदोलन
१ नोव्हेंबरपूर्वी अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी रविवारी येथील इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात अन्यायग्रस्त शिक्षकांनी काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. यावेळी शासन धोरणाचा निषेध नोंदविला. धरणे, आंदोलनानंतर शिक्षकांचे शिष्टमंडळ ना. विनोद तावडे यांच्या भेटीसाठी विद्यापीठात गेलेत. ना.तावडे यांना प्रश्न, समस्यांच्या गाऱ्हाणी अन्यायग्रस्तांनी अवगत केल्यात.
तोडगा काढण्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन
गत १४ वर्षांपासूनचा शिक्षकांचा प्रश्न सोडविताना काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी त्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता ९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे. निश्चितच तोडगा निघेल, यात शंका नाही, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिष्टमंडळाला दिले.