अमरावती-बडनेरा चौपदरी मार्गावरच अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 05:00 AM2020-12-31T05:00:00+5:302020-12-31T05:01:03+5:30
दरदिवसाला महामंडळाच्या शेकड़ो बसेस, ऑटो, शहर बसेस खासगी वाहने, दुचाकींची या मार्गावरून सतत वर्दळ असते. बडनेरा, साईनगर, गोपालनगर, सातुर्णा या भागातून अमरावती शहरात नोकरी व्यवसाय व इतर कामकाजानिमित्त मोठ्या संख्येत लोक ये-जा करतात. पर्यायाने वाहनांची या मार्गावर मोठी गर्दी दिसून येत आहे. अलीकडेच चौपदरीकरण झाले आहे. मार्ग रुंद झाल्याने वाहनचालकांना दाटीतून वाहने चालविण्यापासून दिलासा मिळाला.
श्यामकांत सहस्त्रभोजने
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : चौपदरीकरण होताच अमरावती ते बडनेरा या वर्दळीच्या मुख्य मार्गालगत ठिकठिकाणी दुकाने थाटण्यात आल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. चौपदरीकरण कुणासाठी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दरदिवसाला महामंडळाच्या शेकड़ो बसेस, ऑटो, शहर बसेस खासगी वाहने, दुचाकींची या मार्गावरून सतत वर्दळ असते. बडनेरा, साईनगर, गोपालनगर, सातुर्णा या भागातून अमरावती शहरात नोकरी व्यवसाय व इतर कामकाजानिमित्त मोठ्या संख्येत लोक ये-जा करतात. पर्यायाने वाहनांची या मार्गावर मोठी गर्दी दिसून येत आहे. अलीकडेच चौपदरीकरण झाले आहे. मार्ग रुंद झाल्याने वाहनचालकांना दाटीतून वाहने चालविण्यापासून दिलासा मिळाला. मात्र, या मार्गालगत बऱ्याच ठिकाणी विनापरवानगी खेळणी, स्वेटरविक्रीची दुकाने, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागल्या आहेत. रस्त्यालगत बहुतांश दुकांनापुढे वाहने उभी असतात. पार्किंगचा अभाव असल्याने वाहने थेट रस्त्यावर उभे केली जातात. चौपदरीकरणाने हा मार्ग रुंद झाला असला तरी त्याचा वाहनचालकांना फारसा उपयोग होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मार्गाने अकोला, यवतमाळकडे जाणाऱ्या वाहनांचीदेखील गर्दी असते. रस्त्यालगत होणारे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. यांच्यावर अंकुश नसल्याने अशा व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. चौपदरीकरण करूनदेखील रस्ता अडचणीचा ठरत आहे.
अतिक्रमणासाठीच हा मार्ग मोठा केला का, असा प्रश्नदेखील विचारला जात आहे. अमरावती ते बड़नेरा या मुख्य मार्गावर वर्षभरात मोठ्या संख्येत दुकाने थाटण्यात आली आहेत.
बस थांब्यासमोर दुकाने
अमरावती ते बडनेरा मार्गावर बऱ्याच स्टॉपेजपुढे दुकाने आहेत. याचा प्रवाशांना उभे राहण्यासाठी उपयोग होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.