शहरात अस्ताव्यस्त ‘बॅरिकेट्स’चेच अतिक्रमण!
By admin | Published: November 9, 2016 12:16 AM2016-11-09T00:16:09+5:302016-11-09T00:16:09+5:30
राजापेठ उड्डाणपुलाचे काम सुरु असताना दोन्ही बाजूने लावण्यात आलेले बॅरिकेड्स, फुटपाथवरील अतिक्रमणधारकांना दूर सारण्यासाठी ठिकठिकाणी घेतला जाणारा...
शहरातील वास्तव : वाहतूक पोलीस देतील का लक्ष ?
अमरावती : राजापेठ उड्डाणपुलाचे काम सुरु असताना दोन्ही बाजूने लावण्यात आलेले बॅरिकेड्स, फुटपाथवरील अतिक्रमणधारकांना दूर सारण्यासाठी ठिकठिकाणी घेतला जाणारा बॅरिकेड्सचा आधार, वाहतूक ‘वन-वे’ करण्यासाठी सुद्धा बॅरिकेड्सचाच उपयोग इतकेच नव्हे तर धोकादायक खड्ड्यापासून संरक्षणावरही बॅरिकेड्सचेच पांघरूण, असे चित्र तुर्तास शहरात सर्वदूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे बॅरिकेड्सचा उपयोग कमी आणि अडथळाच जास्त, अशी अवस्था झाली आहे.
पोलीस बंंदोबस्त व वाहनांच्या नाकाबंदीसह एखाद्या आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेड्स वापरले जातात. मात्र, हे बॅरिकेड्स वापरानंतर अस्तव्यस्त पडून असल्याने वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला आहे. याशिवाय अनेक भागात या बॅरिकेड्सचेच ‘सरकारी’ अतिक्रमण झाल्याची स्थिती आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासह राजापेठ, जयस्तंभ आणि शाम चौकासह अन्य काही भागात बॅरिकेड्स लावलेले आहेत. राजापेठ चौकात तर हे बॅरिकेड्स लोकांच्या अंगावर पडतील की काय?, अशी अवस्था आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
वाहतूक नियंत्रण व अन्य नियोाजित कामे झाल्यानंतर बॅरिकेड्स तत्काळ जमा केले जात नसल्याने त्यांचा आता खासगी कामांसाठी वापर सुरु झाला आहे. विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बॅरिकेड्सचा वापर करण्यात येत असला तरी पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
खासगी कामांसाठी वापर
ड्रेनेज दुरुस्ती, रस्ता, पाईप लाईन, दुरुस्तीसह विविध कामे करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ति केली जाते. परंतु या कामावरील कामगारांच्या सुरक्षेसाठी किंवा वाहतूक वळविण्यासाठी रस्त्यावरील बॅरिकेड्स आणले जातात. त्यामुळे ऐनवेळी बॅरिकेड्स गोळा करताना यंत्रणेची धावाधाव होते.
खड्डा बुजविण्याऐवजी ‘बॅरिकेट्स’चे झाकण !
शहरात गटार झाकण्यासाठी किंवा धोकादायक खड्डा दर्शविण्यासाठीसुद्धा त्यावर बॅरिकेड्स उभे केले जातात. शहराचे हृदयस्थळ म्हणविणाऱ्या अतीवर्दळीचा खड्डा बुजविण्याऐवजी त्यावर बॅरिकेड्स लावून हा खड्डा कसा धोकादायक आहे, हेच वाहनधारकांना सांगितले जात आहे. या बॅरिकेड्सला धडकूनच एखादा अपघात घडल्यास त्यासाठी जबाबदार कोण?, असा प्रश्न कुणालाही पडत नाही, हे विशेष.
बॅरिकेट्सच्या मूळ उद्देशालाच हरताळ
अमरावती : शाम चौकातून पुढे नगर वाचनालयाकडे जाणारा छोटा रस्ता देखील बॅरिकेड्स लावून ‘वन-वे’ करण्यात आला. तीन दिवसांपासून तेथे आडवे पडून असलेल्या बॅरिकेड्सला उभे करण्याचे सौजन्य देखील पोलीस वा अन्य यंत्रणेने दाखविले नाही.
पोलिसांना तर काम झाल्यावर ते बॅरिकेड्स उचलून नेण्याची सवडही मिळत नाही. चुनाभट्टी रोडवर असेच काही बॅरिकेड्स रस्त्यावर आडवे पडल्याचे आढळून येते. रामनगर परिसरातील एका बौद्धविहारात महिनाभरापूर्वी एक मोठा कार्यक्रम झाला. तेथील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फ्रेजरपुरा पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही ते उचलून नेण्याचे सौजन्य पोलिसांनी दाखविले नाही.
सण-उत्सवाच्या काळात शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे, आंदोलनांदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोखंडी बॅरिकेड्स वापरले जातात. भाल्यासारखे लोखंडी धारदार पाते असलेले बॅरिकेड्स दिसले की लोकांना पोलिसांच्या नाकाबंदीची चाहुल लागते. मात्र, या बॅरिकेड्सचा वापर झाल्यानंतर ते रस्त्याच्या मधोमध आडवे-उभे पडून असतात. त्यामुळे हे बॅरिकेड्स वापरण्याचा मूळ उद्देश सफल होतो की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.