बांधकाम विभागाच्या निवासावर कंत्राटदाराचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2017 12:11 AM2017-02-01T00:11:29+5:302017-02-01T00:11:29+5:30
धारणी शहराच्या दुभाजकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने चक्क सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंता निवासस्थानावर विनापरवानगी ताबा घेतला आहे.
विनापरवानगी ताबा : प्रयोगशाळेच्या नावाने गैरवापर
श्यामकांत पाण्डेय धारणी
धारणी शहराच्या दुभाजकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने चक्क सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंता निवासस्थानावर विनापरवानगी ताबा घेतला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार कंत्राटदाराला स्वत:च्या कार्र्र्यालयासाठी अशी शासकीय जागा वापरण्यास देण्याची तरतूद असताना त्या जागेवर कर्मचाऱ्यांनी निवासस्थान थाटून वाहनांची व सामानांची ढीग लावून नियमांची धज्ज्या उडवीत आहे.
धारणी शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अमरावती-बुऱ्हानपूर मुख्य मार्गावर रस्ता दुभाजकाचे काम सुरू आहे. हे काम करणाऱ्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंता निवासस्थानावर अवैधरीत्या विनापरवानगीने कब्जा केल्याचे दिसून आले आहे. उपविभागीय अभियंत्याच्या निवासस्थानाला लागून वाहनक पार्किंगच्या जागेवर लोखंडी सरिया ठेवण्यात आले आहेत. सिमेंटचे गोडाऊनही थाटण्यात आले आहे.
कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंतांच्या निवासात चक्क कंत्राटदाराने प्रयोगशाळेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बनविले आहे. याबाबत अधिकृतरीत्या धारणी येथील उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयात माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी गेले असता तेथे एकमात्र र्क्लक वगळता अधिकारी व कर्मचारी बेपत्ता आढळून आले. त्यामुळे कागदोपत्री माहिती मिळाली नाही.
धारणी येथील अभियंता कार्यालयात कुणीच राहत नाही. त्यामुळे निवासस्थान भंगारवस्थेत होते. संबंधित कंत्राटदाराने कार्यालयासाठी जागेची मागणी केली आहे. ते अर्ज मंजूरीकरिता प्रलंबित आहे. मंजूर झाल्यावर शासकीय दराने कंत्राटदाराकडून भाडे वसुली होईल.
- ए. बी. शिरसाट, प्रभारी उपविभागीय अभियंता,
सा. बां. चिखलदरा,धारणी