रेशीम पार्कच्या जागेला अतिक्रमणाचा विळखा
By admin | Published: January 28, 2015 11:07 PM2015-01-28T23:07:08+5:302015-01-28T23:07:08+5:30
अकोली रेल्वे स्थानक पसिरात खुल्या जागेवर अतिक्रमण सुरु आहे. काही महाभागांनी परस्पर भूखंडाची विक्री करण्याचा धंदा सुरु केला असून यात सामान्यांची फसवणूक होत आहे.
अमरावती : अकोली रेल्वे स्थानक पसिरात खुल्या जागेवर अतिक्रमण सुरु आहे. काही महाभागांनी परस्पर भूखंडाची विक्री करण्याचा धंदा सुरु केला असून यात सामान्यांची फसवणूक होत आहे. मोक्याची जागा अतिक्रमणाने वेढली जात असताना महापालिका प्रशासन यापासून अनभिज्ञ आहे.
अकोली रेल्वे स्थानकाच्या अगदी समोरील भागात महापालिका, रेशीम उद्योग आणि महसूल विभागाची खुली जागा आहे. हाकेच्या अंतरावर रेल्वे स्थानक तर काही अंतरावर अकोली गाव, म्हाडा कॉलनी वसलेली आहे. मात्र काही जणांची या खुल्या जागेवर वक्रदृष्टी पडली. मनात येईल त्यानुसार जागा ताब्यात घेण्याचा प्रकार येथे सुरु आहे. कापडी दोऱ्या बांधून जागा ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू आहेत. ज्या जागेवर अतिक्रमण केले जात आहे त्या भागात ८०० ते हजार रुपये दराने भूखंडाचे भाव आहे. त्यामुळे या खुल्या जागेला अनेकांनी लक्ष्य केले आहे. जागा घेरण्यासाठी येथे स्पर्धा लागली आहे. जागा ताब्यात घेण्यासाठी महिला, पुरुषांची होत असलेली गर्दी जणू येथे यात्रा भरल्याचे चित्र आहे. मागील आठ दिवसांपासून जागा घेरण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. अमरावतीच्या बाहेरील व्यक्ती सुद्धा जागा घेरण्यासाठी अकोली रेल्वे स्थानक परिसरात येत असल्याचे दिसून आले आहे.
ही खुली जागा कोणी घेरण्याचे सांगितले असे काही अतिक्रमण घेरणाऱ्यांना विचारले असता घर नाही म्हणून घेरत असल्याचे उत्तर मिळाले. तर काहींनी एका आमदाराचे नाव सांगितले. ही खुली जागा रेशीम उद्योगासाठी राखीव आहे. यापैकी काही जागा महापालिकेच्या मोकाट कुत्र्यांची नसबंदी दवाखाना, आरोग्य विभागासाठी राखीव आहे. महापालिका नियंत्रणात असलेली खुली जागा अतिक्रमणात गेली तर भविष्यात नागरिकांच्या वापरासाढी जागा कोठून आणाव्यात, असा सवाल आहे. खुल्या जागा ताब्यात घेवून ती विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. यापूर्वीसुद्धा खुल्या जागेवर अतिक्रमण करुन शहरातील मोक्याच्या जागा महापालिकेला गमवाव्या लागल्या आहेत.
एकिकडे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु असताना अकोली रेल्वे स्थानक परिसरातील हे अतिक्रमण कधी हटविले जाणार, याकडे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांना घटनास्थळी भेट देऊन अतिक्रमण हटविण्याबाबचे आदेश दिले आहेत.