खुल्या भूखंडावर ‘हरिकिसन मालू’ स्कूलचे अतिक्रमण
By admin | Published: May 28, 2017 12:11 AM2017-05-28T00:11:05+5:302017-05-28T00:11:05+5:30
शेगाव-रहाटगाव रस्त्यावरील देशमुख लॉन मंगल कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी नगरमधील ६१० वर्ग मीटर मोकळ्या जागेवर हरिकिसन मालू स्कुलच्या संचालकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे.
रहिवाशांचे निवेदन : आयुक्तांकडे धाव, चौकशीचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेगाव-रहाटगाव रस्त्यावरील देशमुख लॉन मंगल कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी नगरमधील ६१० वर्ग मीटर मोकळ्या जागेवर हरिकिसन मालू स्कुलच्या संचालकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. हे अतिक्रमण विनाविलंब हटवावे, अशी आर्जव स्थानिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश एडीटीपींना दिले आहे.
ज्ञानेश्वरीनगरमधील भाऊराव पानसे, प्रभाकर वाटाणे, दीपक सोळके, शाम सोळंकी, मंगेश गाढवे, विजय वानखडे, किशोर घुलक्षे, उल्हास बारब्दे, गणेश चव्हाण, श्रीकांत वऱ्हेकर, देशमुख, जोशी, दिलीप पन्नासे यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. २२ मे रोजी या स्थानिकांनी महापालिका आयुक्तांच्या नावे अतिक्रमणाबाबत तक्रार नोंदविली असून यापूर्वी १५ मे रोजीही त्यांनी निवेदन दिले होते.
ज्ञानेश्वरीनगर परिसरातील ६१० वर्गमीटर जागा मोकळी तथा खुली ठेवण्यात आली आहे. ती स्थानिक रहिवाशांच्या वापराकरिता राखीव आहे. मात्र या जागेवर ‘हरिकिसन मालू स्कुल’च्या संचालकांनी तार कुंपण घालून अतिक्रमण केले आहे. तर १५ मेपासून ‘व्यायामशाळा’ या नावाखाली पक्क्या इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ६१० वर्गमीटर या जागेचे मधोमध बांधकाम सुरू केले असल्याने आता तेथील चारही बाजूने असलेली मोकळी जागा इतर कोणत्याही उपयोगात येत नाही. त्यामुळे संस्था संचालकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.
अहवाल मागितला
या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करावी व अहवाल द्यावा, असे निर्देश आयुक्त हेमंत पवार यांनी एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांना दिले आहेत. २२ मे रोजी दिलेल्या या निर्देशानंतर कांबळे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.