मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढले
By admin | Published: August 12, 2016 12:15 AM2016-08-12T00:15:54+5:302016-08-12T00:15:54+5:30
शहरातून गेलेल्या अमरावती ते बुरहानपूर मार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाच्यावतीने
१५० दुकाने हटविली : मुख्य मार्ग मोकळा
धारणी : शहरातून गेलेल्या अमरावती ते बुरहानपूर मार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाच्यावतीने गुरुवारी हटविण्यात आले. अचानक ही मोहीम सुरू झाल्याने व्यावसायिकांची धावपळ झाली.
गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सा.बां.उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मिलिंद पाटणकर, पोलीस निरीक्षक किशोर गवई हे ताफ्यासह बसस्थानकावर धडकले. तेथील अतिक्रमण ४८ तासांत काढण्याचा इशारा ठाणेदार गवई यांनी संबंधितांना दिला. त्यानंतर बसस्थानक ते चर्च मार्गापर्यंतचे हातठेले, कच्चे शेड, हटविले. जेसीबी व ट्रॅक्टर येताच व्यावसायिकांनी स्वत:हून त्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे दोन तासांत बसस्थानक, पेट्रोलपंप, दयाराम चौक, हनुमान चौक येथील दुतर्फा अतिक्रमण मोकळे झाल्याने शहराचे सौंदर्य फुलून उठले. (तालुका प्रतिनिधी)
कारवाईदरम्यान एसडीओंची सतर्कता
कोणतीही सूचना व गाजावाजा न करता अचानक मोहीम सुरू झाल्याने व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली. सर्वांनी अतिक्रमण तातडीने काढण्यास प्रारंभ केला. ही मोहीम गुप्त राहावी, अशी काळजी एसडीओ षणमृगराजन एस. यांनी घेतली होती, हे विशेष.
लोकमतचा पाठपुरावा नागरिकांचे समाधान
मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी तालुका वकील संघ आणि ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमुळे एकीकडे व्यावसायिकांमध्ये नाराजी असली तरी नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.