वडाळीत अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:05 PM2017-09-08T23:05:49+5:302017-09-08T23:06:19+5:30
वडाळी ते पोलीस आशियाना क्लब मार्ग स्थित महसुलच्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी दुपारी पोलीस संरक्षणात हटविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वडाळी ते पोलीस आशियाना क्लब मार्ग स्थित महसुलच्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी दुपारी पोलीस संरक्षणात हटविण्यात आले. अतिक्रमण हटविताना शेकडो नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिस ताफामुळे गर्दी पांगविण्यात यश मिळाले.
वडाळी परिसरातील महसूल विभागाची तीन हेक्टर जागा हमीद चौरसिया व दिगांबर गडपाल यांनी काही वर्षांपूर्वी भाडेपट्ट्यावर घेतली होती. त्यांनी काही दिवस विटभट्टी चालविली. मात्र करार संपल्यानंतर ती जागा मोकळी करण्यात आली. दरम्यान दोन वर्षांपासून शहरातील विटभट्टीला परवानगी नसल्यामुळे ती जागा मोकळीच होती. मात्र, आजूबाजुच्या परिसरातील काही नागरिकांनी महसुलच्या त्या जागेवर बाशे व बल्ला टाकून अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेकांनी त्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार शुक्रवारी तहसीलदारांना प्राप्त झाली. अतिक्रमण हटविण्याच्या उद्देशाने तहसीलदारांनी शुक्रवारी पोलीस संरक्षणात धाड टाकली असता तेथील शेकडो नागरिकांनी विरोध केला. अतिक्रमण काढताना विरोध करताना महिलांचा मोठा सहभाग होता. अनेक नागरिकांनी दोºया बांधून आपआपली हद्द आखून जागेवर अतिक्रमण केले. नागरिकांचा विरोध वाढत असल्याचे पाहून क्युआरटी पथकासह महिला पोलीस पथक घटनास्थळी पोहाचले. पोलिसांनी नागरिकांना पिटाळून लावण्याचे प्रयत्न सुरु केले असता नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाली. ७० ते ८० नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्याविरोधामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ती जागा चौरसियाकडून ४० हजारात खरेदी केल्याचे नागरिकांनी तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांना सांगितले. मात्र, ती जागा महसुलचीच असल्याचे तहसीदारांनी जाहीर स्वरुपात नागरिकांना सांगितले. सरकारी मालमत्ता कोणाला विकता येत नाही. त्यावर अतिक्रमण करता येत नाही. पैसे घेऊन जागा खरेदी केली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा, त्यावर पोलीस कारवाई करतील , असा सल्ला तहसीलदारांनी नागरिकांना दिला.
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवेळी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत, एसीपी डोंगरदिवे, फे्रजरपुरा प्रभारी ठाणेदार कुळकर्णी, एपीआय इंगळे, रवि राठोड यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता.