अखेर ‘त्या’ ३५ लोकांच्या मानगुटीवरील भूत उतरविण्यात अंनिसला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:12 AM2021-04-03T04:12:19+5:302021-04-03T04:12:19+5:30

अखेर ‘त्या’ ३५ लोकांच्या मानगुटीवरील भूत उतरविण्यात अंनिसला यश अमरावती : जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथून पाच ...

In the end, Annis succeeded in bringing down the ghost on the wrists of 'those' 35 people | अखेर ‘त्या’ ३५ लोकांच्या मानगुटीवरील भूत उतरविण्यात अंनिसला यश

अखेर ‘त्या’ ३५ लोकांच्या मानगुटीवरील भूत उतरविण्यात अंनिसला यश

Next

अखेर ‘त्या’ ३५ लोकांच्या मानगुटीवरील भूत उतरविण्यात अंनिसला यश

अमरावती : जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवरा या तीन हजार लोकवस्तीच्या ग्रामपंचायतमध्ये काही दिवसांपूर्वी पारधी समाजातील सुमारे ३० ते ३५ महिला व पुरुषांच्या अंगात एकाच वेळी देवी संचारल्याची घटना सर्वदूर पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. तेथील स्थानिक मांत्रिकाने या सर्वांना भुताने झपाटलेले आहे, अशी दहशत परिसरात निर्माण केली तसेच त्यांचे भूत उतरवण्याकरिता त्यांना विठोबा सावंगा या ठिकाणी घेऊन गेले. तिथे त्यांनी भूत उतरवण्याकरिता अमानुष मारहाण केली. याची माहिती प्रश्नचिन्ह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पारधी समाजातील कार्यकर्ते मतीन भोसले यांना मिळाली. त्यांनी ही माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती येथील प्रवीण गुल्हाने व श्रीकृष्ण धोटे यांना फोनद्वारे दिली. त्यानंतर ताबडतोब विठोबा सावंगा येथे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली.

अंगातील भूत उतरवण्याकरिता विठोबा सावंगा हे गाव ओळखले जाते. म्हणूनच या गावाला भुताची सावंगी म्हणूनदेखील ओळखले जाते. त्यानंतर २ एप्रिल रोजी मंगरूळ चव्हाळाचे ठाणेदार पडघन व त्यांचा संपूर्ण ताफा तसेच श्रीकृष्ण धोटे, प्रवीण गुल्हाने, मतीन भोसले, ओंकार पवार आदी मंडळी शिवरा या गावी पोहोचले. त्याठिकाणी एक सार्वजनिक कार्यक्रम मंदिराच्या परिसरात घेण्यात आला. याप्रसंगी मतीन भोसले यांनी कार्यक्रमाचे महत्त्व आणि गरज याबद्दल उपस्थित पारधी समाजाला माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार पडघन साहेब यांनी गावातील वातावरण शांत व सलोख्याचे ठेवण्याकरिता अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. त्‍याचप्रमाणे महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांनी जादूटोणा व बुवाबाजीविरोधी कायद्याबाबत सर्वांना माहिती दिली. बुवाबाजी करणाऱ्या भगत मंडळींनी लोकांमध्ये भय पसरविणारे कृत्य केल्यास पोलिसांत तक्रार देऊ, अशी तंबी याप्रसंगी देण्यात आली. श्रीकृष्ण धोटे यांनीदेखील अनिसच्या कार्याची माहिती देत काही चमत्कारांचे सादरीकरण केले. त्यामुळे ग्रामस्थांना आपण चमत्काराच्या नादाला कसे फसले जातो, याचीही कल्पना आली. संचालन प्रश्नचिन्ह शाळेचे मुख्याध्यापक ओंकार पवार यांनी केले. याप्रसंगी मंजू पवार, सुभाषचंद्र शेखर पवार तसेच पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक पारधी लोकांच्या या बेड्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही नवीन पारधी लोक शिवरा या गावात आले. त्यापैकी स्वतःला भगत म्हणणारे गजानन भोसले व त्याचे वडील यांनी सोने मिळवून देतो, असे आमिष देऊन काही लोकांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवले. त्याचबरोबर ज्याच्या लोकांना ही बातमी मिळू लागली, त्यांनीदेखील भुताची लागण झाल्याचे सोंग सुरू केले. त्यामुळे ही संख्या वाढत जाऊन ३५ पर्यंत पोहोचली. कार्यक्रमाच्या शेवटी चर्चेदरम्यान यातीलच काही लोकांनी ही माहिती उघड केली. शेवटी पोलीस विभाग, मतीन भोसले तसेच अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांना योग्य माहिती देऊन यापुढे असे घडणार नाही, याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Web Title: In the end, Annis succeeded in bringing down the ghost on the wrists of 'those' 35 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.