महिन्याअखेरीस पेढी प्रकल्पग्रस्तांना घरांचा मोबदला
By Admin | Published: January 6, 2016 12:11 AM2016-01-06T00:11:33+5:302016-01-06T00:11:33+5:30
निम्नपेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अळणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना जानेवारी अखेरीस त्यांच्या घरांचा आर्थिक मोबदला मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
अमरावती : निम्नपेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अळणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना जानेवारी अखेरीस त्यांच्या घरांचा आर्थिक मोबदला मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
अळणगाव येथील ५६० पेक्षा अधिक घरांच्या मूल्यांकनाचा प्रस्ताव अंतिम निवाड्यासाठी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी (दि.५) या प्रस्तावावर महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे यांची स्वाक्षरी झाली आहे. मंगळवारीच सुुमारे ३० कोटी रुपयांच्या या प्रस्तावाची फाईल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आली. त्यामुळे येत्या २-३ दिवसांमध्ये विभागीय आयुक्तांकडून अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अळणगांव ग्र्रामस्थांना त्यांच्या घराच्या किंमत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
विभागीय आयुक्तांकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर तो मूल्यांकन प्रस्ताव भूसंपादन विभागाकडे येईल व त्यानंतर कलम १२/२ ची नोटिस प्रक्रिया ग्रामपंचायतस्तरावर राबविली जाईल. अळणगाव येथील घरांची संख्या पाहता मूल्यांकन रकमेचे टप्पानिहाय वितरण करण्यात येणार आहे.
भातकुली तालुक्यातील निंभा नजिक पेढी नदीवर निम्नपेढी सिंचन प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. अळणगावसह ५ गावे पूर्णत: तर २ गावे अंशत: बुडीत क्षेत्रात आहेत.
या पाच गावचे पुनर्वसन होणार असून घरांचे मूल्यांकन होऊन मोबदलाही मिळणार आहे. अळणगाव येथील प्रकल्पग्रस्त कुटूंबियांचे पुनर्वसन कठोरा-रेवसा मार्गावरील गावठाणावर प्रस्तावित आहे. तथापि घरांचे मूल्यांकन होऊनही मोबदला न मिळाल्याने पुनर्वसन प्रक्रियेला ब्रेक लागला होता. या महिन्याच्या अखेरीस घरांची किंमत हाती आल्यानंतर पुनर्वसन ग्रामातील मुलभूत सुविधा आणि तत्सम बाबींना गती प्राप्त होणार आहे.