ऊर्जामंत्र्यांनी मार्डीत येऊन ऐकले ग्रामस्थांचे गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 06:08 PM2017-08-22T18:08:38+5:302017-08-22T18:08:53+5:30
शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावरील मार्डी गावात दररोज मध्यरात्रीनंतर केल्या जाणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेतली न गेल्याने याची तक्रार ऊर्जामंत्र्यांद्वारे अमरावतीत रविवारी आयोजित जनता दरबारात येथील महिलांनी केली होती.
अमरावती, दि. 22 - शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावरील मार्डी गावात दररोज मध्यरात्रीनंतर केल्या जाणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेतली न गेल्याने याची तक्रार ऊर्जामंत्र्यांद्वारे अमरावतीत रविवारी आयोजित जनता दरबारात येथील महिलांनी केली होती. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी समस्या तत्काळ निकाली लावण्यासह मार्डीला भेट देण्याचे आश्वासन दिले आणि ते पाळले सुद्धा. ऊर्जामंत्र्यांनी याच दिवशी रात्री ९ वाजता मार्डीला भेट देऊन येथील अडचणींचे प्रत्यक्ष अवलोकन केले. यामुळे मार्डीवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी ऊर्जामंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.आनंदराव अडसूळ व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मार्डी हे गाव महावितरणच्या गावठाण व कृषी वाहिनीवर येत असल्यामुळे यागावांना २४ तास वीजपुरवठा करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य होत नव्हते. परिणामी यागावाला रोज सकाळी ३.३० ते ९.३० असे एकूण ६ तास भारनियमन सोसावे लागत होते. परंतु मध्यरात्रीनंतर होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले होते. डासांच्या प्रादुर्भावामुळे रात्रीची झोप उडाली होती. यासंदर्भात महिलांनी ऊर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात गा-हाणे मांडले. त्यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मार्डीतील भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करून मध्यरात्रीऐवजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत लोडशेडिंग करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे, अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंते सर्वश्री दिलीप मोहोड, एच.पी.ढोके व इतर अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.