अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:05 AM2021-08-02T04:05:34+5:302021-08-02T04:05:34+5:30
अमरावती : अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या एका युवतीला डेंग्यू झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, डेंग्यूचा ...
अमरावती : अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या एका युवतीला डेंग्यू झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, डेंग्यूचा हा प्राथमिक चाचणी अहवाल असून, अंतिम अहवाल अकोला येथील प्रयोगशाळेतून येणे बाकी आहे.
वंचित आघाडी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी ज्ञानेश्वर डोंगरे यांची २२ वर्षीय मुलगी श्रुतिका डोंगरे ही गत काही दिवसांपासून आजारी जोती. त्यामुळे एका खासगी रूग्णालयात तिला उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिथे तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला राजापेठ येथील रेडीयंट हॉस्पीटलमध्ये २९ जुलै रोजी हलविण्यात आले. दरम्यान तिची डेंग्यूची प्राथमिक चाचणी (एनएस १) करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रकृती बिघडत गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शनिवार, ३० जुलै रोजी हिंदू स्मशानभूमी येथे रात्री ११ अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांना विचारणा केली असता, या युवतीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अधिकृत अहवाल यायचा आहे, कागदपत्रे मागविली असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------
मृत युवती सुरूवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल होती. तिथे तिची प्रकृती बिघडल्यावर आमच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचा डेंग्यूचा 'एनएस १' अहवाल पॉझिटिव्ह असून, त्याबाबतची माहिती महापालिकेला दिली आहे.
डॉ. सिकंदर अडवाणी, रेडिएंट हॉस्पिटल