इंजिनीअर तरुणाचा मृतदेह सापडला छत्री तलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:08 PM2017-12-26T23:08:19+5:302017-12-26T23:09:23+5:30
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंजिनीअर तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी छत्री तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंजिनीअर तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी छत्री तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
पोलीस सूत्रानुसार, राहुल चंद्रकांत ताठे (२३, रा. विठ्ठलार्पण कॉलनी, फरशी स्टॉप, सुदर्शन बिल्डिंगजवळ) असे मृताचे नाव आहे. त्याने पुणे शहरात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. तीन दिवसांपूर्वी तो घरून अचानक बेपत्ता झाला. याबाबत त्याच्या नातेवाइकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मंगळवारी एक मृतदेह छत्री तलावाच्या पाण्यात तरंगताना काही जणांना आढळून आल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून राजापेठ ठाण्याचे पोलीस शिपाई राजू सपकाळ यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून राहुल ताठेची ओळख पटविली व घटनास्थळाचा पंचनामा केला. त्याचा मृतदेह इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
आ. राणांनी केले राहुलच्या कुटुंबीयांचे सात्वन
राहुल ताठेने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आ. रवि राणा यांना छत्री तलावाच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सोबत राहुलच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.