पालिकेच्या उर्दू शाळेत इंग्रजांचा ध्वज सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:33+5:30
सन १८९२ साली चांदूर बाजार शहरात सुरू झालेली तालुक्यातील पहिली शाळा आजही सुरू आहे. १२८ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात या शाळेत पहिल्यांदा इंग्रजांचा युनियन जॅक फडकला होता. हा युनियन जॅक शाळेवर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होता. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही ब्रिटिशांचा तो ध्वज या शाळेमध्ये सुरक्षित आहे.
सुमित हरकूट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदुर बाजार : सन १८९२ साली चांदूर बाजार शहरात सुरू झालेली तालुक्यातील पहिली शाळा आजही सुरू आहे. १२८ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात या शाळेत पहिल्यांदा इंग्रजांचा युनियन जॅक फडकला होता. हा युनियन जॅक शाळेवर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होता. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही ब्रिटिशांचा तो ध्वज या शाळेमध्ये सुरक्षित आहे. कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष मीर लियाकत अली यांच्या मार्गदर्शनात १८९२ साली तालुक्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली होती. शाळा सुरू झाली त्यावर्षी पहिल्या वर्गात २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. १८९३ साली १७ विद्यार्थी, १८९४ साली १९ विद्यार्थी, १८९५ साली २१ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र त्या काळात मुलींना शिक्षणाकरिता विरोध असल्याने एकही मुलीने शाळेत प्रवेश घेतला नव्हता. १९०१ साली तालुक्यातील पहिल्या मुलीने प्रवेश घेतला होता. यावर्षी शाळेत १९ मुले व १ मुलगी शिक्षण घेत होती. १९०२ साली १७ मुले व ४ मुलींनी प्रवेश घेतला. १९०३ मध्ये २१ मुले व ३ मुली तर १९०४ मध्ये २६ मुले व ७ मुली नि प्रवेश घेतला होता. आज या शाळेला १२८ वर्ष झाली आहे.